राज्यमार्गावरील दुभाजकांना गवताचा विळखा

समोरील वाहन दिसत नसल्याने अपघाताची शक्यता

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत-कल्याण या दुपदरी राज्यमार्ग रस्त्यावर असलेले दुभाजक हे सध्या पावसाळ्यात उगवलेल्या गवताने भरले आहेत. त्यामुळे समोरून जाणारे कोणतेही वाहन दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याच्या मध्यभागी आणि दुतर्फा उगवलेले गवत कापून टाकावे, अशी मागणी मानवाधिकार आयोगाचे वतीने करण्यात आली आहे. कर्जत-कल्याण-भिवंडी-अहमदाबाद राज्यमार्ग रस्ता कर्जत तालुक्याच्या 21 किलोमीटर लांबीचा आहे. त्यातील बहुतांश रस्ता हा दुपदरी असून, गावे आणि वन खात्याची जमीन असलेल्या ठिकाणी हा रस्ता एकपदरी अस्तित्वात आहे. दुपदरी रस्ता असलेल्या ठिकाणी रस्त्याची निर्मिती करताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून दोन्ही बाजूने जाणाऱ्या रस्त्याच्या मध्ये दुभाजक निर्माण केले आहेत. त्या दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडे लावली जाणार होती. मात्र, या रस्त्याची निर्मिती होऊन दहा वर्षांचा कालावधी लोटला तरी शोभिवंत झाडांची लागवड शासनाच्या कोणत्याही यंत्रणेने केली नाही. त्यामुळे पावसाळ्यात त्या रस्त्याचे दुभाजक हे गवताने भरून जातात. दुसरीकडे ते गवत एवढ्या उंचीचे होते की त्यामुळे दोन्ही बाजूंनी जाणारी वाहने ही एकमेकांना दिसत नाहीत. त्यात या रस्त्यावर कर्जतपासून रायगड जिल्हा हद्दीपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गावात जाण्यासाठी रस्ते आहेत, त्यामुळे तेथे रस्त्यामधून वाहने इकडे तिकडे जात असतात. त्यामुळे अपघात होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

मानवाधिकार कार्यकर्ते गोरख शेप यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन रस्त्याच्या दुभाजक वाढलेले गवत आणि आजूबाजूला वाढलेले गवत कापून टाकण्यात यावे, अशी मागणी केली आहे. याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजीव वानखेडे यांनी आमच्या खात्याकडून गवत कापण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती दिली. मात्र, ही कामे संथ गतीने सुरू असल्याने वेगाने सुरू करावी, अशी मागणी गोरख शेप यांनी केली आहे.

येथे गवताचे साम्राज्य

कर्जत जवळील देऊळ वाडी येथून हा रस्ता वांजले गावापर्यंत दुपदरी आहे, तर पुढे हडप वडापावपासून पुन्हा सावर गावपर्यंत दुपदरी बनला आहे. नंतर सावरगाव वाडीपासून उमरोलीपर्यंत मार्गात असलेल्या भागात दुभाजक गवताने भरले आहेत. रायगड हॉस्पिटलपासून नेरळ हुतात्मा चौकपर्यंत हा रस्ता दुपदरी असून, त्या भागातदेखील दुभाजक गवताने व्यापले आहेत. नेरळ विद्या मंदिर शाळेपासून रायगड हद्द पर्यंत देखील हा रस्ता दुपदरी असून, त्याचा परिणाम रस्त्यात असलेले दुभाजक हे गवताने भरले आहेत. केवळ दुभाजक नाहीत तर रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात वाढलेले गवत हे रस्त्यावर आल्याने रस्त्याची रुंदीदेखील कमी झाली आहे. त्याचा परिणाम वाहन चालकांना आपली वाहने चालवताना होत असून, गाडी चालवणे कठीण होऊन बसले आहे.

Exit mobile version