रस्त्यावरील खडी अपघाताला निमंत्रण

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड, जेएनपीए बंदर परिसरातील रस्त्यांवर विखुरलेली लहान, मोठी खडी प्रवासी वाहनांना अपघाताला निमंत्रण देत आहे. त्यात आठ-दहा दिवसांत रस्त्यावर विखुरलेल्या खडीवरुन मोटारसायकल स्वार घसरुन पडल्याने झालेल्या अपघात दहा ते पंधरा जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. तरी एनएच फोर, सार्वजनिक बांधकाम विभाग उरण, सिडको आणि जेएनपीए बंदर प्रशासनाने अपघाताला कारणीभूत ठरत असणारी रस्त्यावरील खडी हटविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी उरण तालुका मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

जेएनपीए बंदरामुळे तसेच सिडकोमुळे उरण तालुक्यात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. अशा दैनंदिन नोकरदार, प्रवासी, विद्यार्थ्यी,यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग उरण, एन एच फोर, सिडको, जेएनपीए बंदर प्रशासनाने उरण, जेएनपीए बंदर व द्रोणागिरी नोड परिसरात रस्त्यांची व उड्डाण पुलाची उभारणी केली आहे. परंतु संबंधित प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सर्रासपणे ठेकेदार हे रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची करत आहेत. तसेच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मेंटेनन्सचा ठेका घेऊनही कामे संबंधित ठेकेदार मार्गी लावत नाहीत. त्यामुळे उरण, जेएनपीए बंदर, द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यांवर विखुरलेली खडी, खड्डे पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.अशा विखुरलेल्या खडीतून व खेड्यातून मार्गक्रमण करणार्‍या वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. तरी संबंधित प्रशासनाने आपापल्या अखत्यारीत येत असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजवून विखुरलेली खडी हटविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी उरण तालुका मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. तशा प्रकारचे पत्र मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, अल्पेश कडू यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहेत.

Exit mobile version