किवींची विजयाची हॅट्ट्रिक

बांगलादेशवर 8 गडी राखून विजय

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

न्यूझीलंड आणि बांगलादेश या दोन्ही संघांमधील चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने 50 षटकांत 9 गडी गमावून 245 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने 42.5 षटकांत 2 गडी गमावून विजय मिळवला.

न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक नाबाद 89 धावा केल्या. कर्णधार केन विल्यमसनने 78 धावांची खेळी केली. तो जखमी होऊन तंबूत परतला. तसेच डेव्हॉन कॉनवेने 45 धावांचे योगदान दिले. रचिन रवींद्र नऊ धावा करून बाद झाला. ग्लेन फिलिप्सने नाबाद 16 धावा केल्या. मुस्तफिजुर रहमान आणि शाकिब अल हसन यांना प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याचबरोबर लॉकी फर्ग्युसन सामनावीर ठरला.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघाने सातत्याने गडी बाद झाल्याने 50 षटकांत 9 गडी गमावून 245 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीमने सर्वाधिक 66 धावा केल्या. अनुभवी खेळाडू महमुदुल्लाहने नाबाद 41 आणि कर्णधार शकीब अल हसनने 40 धावा केल्या. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने तीन, ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्रीने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

Exit mobile version