द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।

पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी (दि. 29) पहाटे घडली. अचानक रांग बदलणाऱ्या कंटेनरमुळे झालेल्या अपघातात इनोव्हा कारमधील दोघांना आपला जीव गमवावा लागला, तर अन्य प्रवासी जखमी झाले. पहाटेच्या शांत वेळेत घडलेल्या या भीषण अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पूणे–मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गवर आदई गावालगत हा अपघात झाला. मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका कंटेनरने अचानक रांग बदलली. त्याच वेळी मागून येणाऱ्या इनोव्हा कारला कंटेनरच्या बाजूला जोरदार धडक बसली. या धडकेत इनोव्हा कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातात सांगली येथील रहिवासी अरुण कचरे (45) आणि तुळसा पवार (40) यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शैलेंश भद्रे यांनी दिली. अपघाताच्या वेळी इनोव्हा कारमध्ये एकूण सात प्रवासी होते. हे सर्व प्रवासी सांगली येथून कळंबोलीकडे प्रवास करत होते. अपघातात इनोव्हा कारमधील अन्य दोन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली, तर तीन प्रवाशांना मुकामार लागल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींना तत्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, कंटेनर चालक चंदु प्रकाश याने निष्काळजीपणे वाहन चालवत अचानक रांग बदलल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. संबंधित चालकाला ताब्यात घेऊन नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

Exit mobile version