| खांदा कॉलनी | राजेश डांगळे |
एका खांद्यावर संसाराचा गाडा, कावडीच्या एका टोकाला घरातील मोजके सामान आणि दुसऱ्या टोकाला चिमुकला… तर हातात डोंबारी खेळाचे साहित्य घेऊन पोटासाठी गावोगाव भटकणारे हे कुटुंब. शुक्रवारी पनवेलच्या गजबजलेल्या रस्त्यावर दिसलेले हे दृश्य अनेकांच्या काळजाला चटका लावून गेले.
डोंबारी खेळ दाखवून मिळणाऱ्या चार पैशांवर संसाराचा गाडा हाकणाऱ्या या कुटुंबाची जगण्यासाठीची धडपड या दृश्यातून प्रकर्षाने जाणवत होती. एका बाजूला कुटुंबाचे मोजके सामान, दुसऱ्या बाजूला लहान मुलाला कावडीत बसवून हा पिता पायी चालत होता. त्याच्यासोबत दुसरे चिमुकले मूलही पायी चालत होते. डोक्यावर छप्पर नाही, हातात कायमचा रोजगार नाही; उद्याची भ्रांत असतानाही लेकरांच्या पोटासाठी रस्त्यावरची वाट धरावी लागत आहे. महागाई आणि रोजगाराच्या अनिश्चिततेच्या काळात डोंबारी खेळ करून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे. पावसाळ्यात ओल्या रस्त्यांवरून मुलांना घेऊन केलेला हा प्रवास त्यांच्या जगण्याची कठीण बाजू दाखवून देतो. शहराच्या झगमगाटात विकासाच्या उंच इमारती उभ्या राहत असताना, त्याच रस्त्यावर कावडीत संसार घेऊन फिरणारे हे कुटुंब गरिबीचे अस्वस्थ करणारे वास्तव दाखवून जाते. पोटाची खळगी भरण्यासाठी सुरू असलेली ही धडपड पाहून अनेक नागरिकांच्या डोळ्यांत नकळत पाणी आले.





