मुंबईत इमारतीला भीषण आग

जीव वाचविण्याच्या धडपडीत एकाचा मृत्यू
मुंबई | वृत्तसंस्था |
मुंबईतल्या लालबाग परिसरातल्या अविघ्न पार्क या 60 मजली इमारतीला शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास आग लागली. या आगीमधून बाहेर पडण्यासाठी, आपला जीव वाचवण्यासाठी एका व्यक्तीने 19 व्या मजल्यावरुन उडी मारली, त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. ही आग सुरुवातीला 25 व्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. मध्यभागी आग लागल्याने ती खाली आणि वरच्या मजल्यापर्यंत पोहोचत होती. मात्र, अग्निशमन दलाने ही आग विझवायला सुरुवात केल्यानंतर ती आटोक्यात आली. सुरुवातीला आग विझवण्यामध्ये बर्‍याच अडचणी येत होत्या.
या घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी पोहोचल्या होत्या. या आगीस कारणीभूत घटकांचा शोध घेऊन उचित कारवाई केली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. सध्या ही आग नियंत्रित आल्याची माहिती आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे.
शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जीव वाचवण्यासाठी खाली पडलेल्या व्यक्तीला केईएम रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले आहे. नवीन इमारत असल्याकारणाने खूप लोक इमारतीत नव्हते.

Exit mobile version