मुरुडमध्ये ‌‘इंडिया’चीच आघाडी

15 पैकी 7 ग्रामपंचातींवर फडकवला झेंडा

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 7 ग्रामपंचायतींवर इंडिया आघाडीने घवघवीत यश संपादन केले आहे. आगरदांडा ग्रामपंचायतीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थेट सरपंच व सदस्य निवडून आले आहेत. परंतु, या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे आशिष नरेंद्र हेदुलकर यांनी शिंदे गटाचे मुरुड तालुका प्रमुख व आमदारांचे खंदे समर्थक ऋषिकांत डोंगरीकर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.

इंडिया आघाडीला शीघ्रे, विहूर, नांदगाव, मांडला, भोईघर, चोरडे व राजपुरी या सात ग्रामपंचायतींवर यश मिळाले आहे. तर, बोर्ली ग्रामपंचायत निवडणुकीत इंडिया आघाडीच्या थेट सरपंचपदाच्या उमेदवार अस्मिता वामन चुनेकर यांना पाच मतांनी पराभव पत्करावा लागला. येथे शिंदे गटाच्या सपना संजय जयपाटील या विजयी झाल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या एकदरा, बोर्ली, वळके, तळेखार, काशीद या ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखण्यात यश प्राप्त केले आहे. भारतीय जनता पार्टीने साळाव व मिठेखार या ग्रामपंचायतीवर विजय प्राप्त केला आहे. आज मतमोजणी असल्याने मुरुड तहसील कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. या निवडणूक निकालाची सर्वांनाच उत्सुकता होती. सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात झाली. तीन वाजेपर्यंत निकाल जाहीर झाले होते.

सर्व तालुक्याचे नांदगाव ग्रामपंचायतीकडे लक्ष होते. कारण, एक सर्वसाधारण महिला इंडिया आघाडीच्या माध्यमातून थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत उतरल्या होत्या. अत्यंत चुरशीच्या लढतीत अल्पा घुमकर यांना 984 मते मिळाली, तर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते व ज्यांनी 15 वर्षे नांदगाव ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवली होती असे विलास सुर्वे यांचा 233 मतांच्या फरकाने पराभव केला. सुर्वे यांना 751 मतांवर समाधान मानावे लागले. तर, नवखे व प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणारे भाजपचे थेट सरपंचपदाचे उमेदवार स्वप्नील चव्हाण यांना 671 एवढे मोठे मताधिक्य मिळाल्याने राजकीय समीकरणे बदलल्याचे सिद्ध झाले आहे. नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये इंडिया आघाडीचे मेघा मापगावकर, विक्रांत कुबल, अंजुम घोले, उदय थळे, विजयश्री रावजी, अमिषा पाटील, नितेश रावजी हे ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. इंडिया आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचे थेट सरपंच म्हणून शीघ्रे ग्रामपंचायतीमध्ये गुलाब वाघमारे, राजपुरी ग्रामपंचायतीमध्ये सुप्रिया गिदी, चोरढे ग्रामपंचायतीमध्ये तृप्ती घाग, विहूरमध्ये रेश्मा तपीसर या निवडून आलेल्या आहेत.

Exit mobile version