पेण-खोपोली रोड महामार्ग रुंदीकरणामुळे नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षणाचे निर्देश

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

पेण-खोपोली रोड राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करताना बाधित झालेल्या कामार्ली येथील कुटुंबांकडून मोबदला देण्याची मागणी होत आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर संयुक्तपणे या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या.

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पेण-खोपोली रोड राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणातील बाधितांना मोबदला देण्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचेसह पेण तालुक्यातील कामार्ली येथील ग्रामस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पेण-खोपोली रोड राष्ट्रीय महामार्गाचे १८ मीटरचे रुंदीकरण करताना १५ स्थानिक ग्रामस्थांची घरे, दुकाने बाधित होत आहेत. त्याशिवाय ३० मीटरचे रूंदीकरण केल्यास बाधित होणाऱ्या घरांची संख्या १०० च्या आसपास जाते. केंद्र शासनाच्या नियमांनुसार जर अतिक्रमण काढताना कुणीही बेघर होत असल्यास त्याला नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे.

कामार्ली येथून जाणाऱ्या महामार्गाच्या रुंदीकरणामुळे ज्यांची घरे, दुकानांचे नुकसान झाले आहे, अशा सर्वांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज दिल्या.

Exit mobile version