मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
। सोलापूर । प्रतिनिधी ।
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोन्याच्या हव्यासापोटी सालगड्याने आपल्याच शेत मालकाचा खून केला आणि त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरून ठेवले. मात्र पोलीस तपासातून हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. कृष्णा नारायण चामे (52) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते सोन्याचे लॉकेट, अंगठ्या, कडे असे भरपूर दागिने वापरत होते. मात्र, या दागिन्यांचा मोह त्यांच्या शेतात काम करणाऱ्या सचिन भागवत गिरी या मजुराला झाला. त्याने कृष्णा चामे यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून त्यांचा खून केला. त्यानंतर हत्येचा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून त्याने धारदार शस्त्राने मृतदेहाचे तुकडे तुकडे करून ते वेगवेगळ्या पॉली कॅप कॅरीबॅगमध्ये भरले आणि घरासमोरील शौचालयाच्या शोष खड्ड्यांमध्ये पुरून ठेवले.
मृत कृष्णा चामे हे बेपत्ता झाल्याबाबत त्यांच्या घरच्या मंडळींनी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तपासामध्ये चामे यांच्या शेतात सालगडी म्हणून असलेल्या सचिन भागवत गिरी याने एक माहिती दिली. कृष्णा चामे यांना एका अज्ञात व्यक्तीने दुचाकीवर नेल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मोहोळ पोलिसांनी यासंदर्भात बेपत्ताऐवजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्याबाबतही कोणतेही धागेदोरे सापडत नसल्याने सालगडी सचिन गिरी याची पुन्हा विश्वासात घेऊन चौकशी केली असता विसंगत माहिती मिळू लागल्याने पोलिसांनी सालगड्याची कसून चौकशी केली असता शेवटी या गुन्ह्याची उकल झाली. त्याने हा गुन्हा स्वतः केल्याची कबुली दिली.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच हा खून एकट्याने सालगड्याने केल्याची प्राथमिक माहिती असली तरी त्याच्यासोबत अन्य साथीदार आहेत किंवा कसे, याबाबत मोहोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.