। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन येथील धोंडगल्ली परिसरात गुरुवारी (दि.30) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोन ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली. एका तीव्र उताराच्या पायवाटेवरून एक भला मोठा दगड वेगाने खाली आला आणि घराच्या बाजूलाच उभ्या केलेल्या दुचाकीवर आदळला. सुदैवाने, दुचाकीवर धडकल्यानंतर दगड तिथेच थांबल्याने एक मोठी दुर्घटना टळली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जर हा दगड मुख्य रहदारीच्या रस्त्यावर आला असता तर मोठी जीवितहानी झाली असती. या घटनेत दुचाकीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या पायवाटेच्या मार्गावर अनेक घरे असून दरड कोसळण्याचा धोका नेहमीच असतो. तरीही श्रीवर्धन नगरपरिषदेने या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही आवश्यक उपाययोजना केलेल्या नाहीत, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने येथे तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
landslide: श्रीवर्धन मध्ये दरड कोसळली
