। पुणे । प्रतिनिधी ।
येरवड्यातील रामनगर परिसरात शुक्रवारी (दि.19) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. जवळपास कोणीही नसल्याने मोठी जीवित व वित्तहानी टळली. मात्र, परिसरात भीतीचे वातावरण आहे.
रात्रीच्या वेळी दरड कोसळल्याचा आवाज झाल्यानंतर परिसरातील रहिवासी निरंजन कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ‘जेसीबी’च्या साहाय्याने रस्त्यावरील दगड-माती बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. स्थानिक रहिवासी निरंजन कांबळे यांनी सांगितले की, डोंगराच्या पायथ्याशी नागरिकांची ये-जा असते. अनेकजण वाहने उभी करतात. हा परिसर अधिक धोकादायक होत आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दरडीचा राडारोडा हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.







