रोहा तालुक्यातील तिसे गावात दरड कोसळली

दरडग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यश

| गोवे-कोलाड | विश्वास निकम |

रोहा तालुक्यातील तिसे गावात दरड कोसळून डोंगराचा काही भाग ढासळला. या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. मात्र दगड गोटे घरावर धडकल्याने चंद्रकांत मुरकर यांच्या घराला तडे गेले. तर कुटुंबांना आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, यासाठी घरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.


ही घटना शुक्रवारी (दि.8) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी अकरा कुटुंबांना प्रसंगावधान राखत सुरक्षित ठिकाणी हलविले. तर घटनेची माहिती मिळताच आ. अनिकेत तटकरे, कोलाड पोलिस उपनिरीक्षक अजित साबळे, स्थानिक प्रशासन, रोहा प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, मंडल अधिकारी गुंड, तलाठी केंद्रे तसेच स्थानिक पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांना दिलासा दिला. तिसे येथे गुरूवारी आणि शुक्रवारी दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे डोंगराचा काहीसा भाग जोरदार अचानक ढासळल्याने एकच खळबळ उडाली. पावसात रायगड जिल्ह्यात महाड येथील तळीये, नंतर इर्शाळवाडीच्या घटनेमुळे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात भयभीत झाले होते. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना संपर्क साधून योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. रोहा तालुक्यातील ही काही गावे डोंगर भागात तसेच पायथ्याशी आहेत. या घटनेमुळे गावांचा स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण अधिकारी हे शनिवारी येथे भूशास्त्रीय सर्वेक्षण करणार असून अहवाल सादर करतील. तूर्तास खबरदारीचा उपाय म्हणून येथील 20 कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी गावातच हलविण्यात आले आहे. ग्रामस्थांसोबत पुढील चर्चा करुन विश्वासात घेत स्थलांतराबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

आ.अनिकेत तटकरे
Exit mobile version