थीम पार्कची मोडतोड, लॉनवर काँक्रिटचा थर

पेण नगरपालिकेचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात

| पेण | प्रतिनिधी |

शहरातील म्हाडा वसाहतीतील थीम पार्कमध्ये उघडपणे सुरू असलेल्या मोडतोडीच्या प्रकारामुळे आणि वादग्रस्त कामांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वीच उभारण्यात आलेले विद्युतदिवे हेतुपुरस्सर तोडण्यात आल्याचा आरोप होत असताना, दुसरीकडे हिरवेगार लॉन काढून त्यावर थेट काँक्रिटीकरण केल्याने पेण नगरपालिका प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

थीम पार्कमध्ये लाईटचे काम पूर्ण होऊन तीन महिनेही उलटले नसताना अनेक विद्युतदिवे तोडलेल्या अवस्थेत दिसत आहेत. विशेष म्हणजे, पार्कमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असूनही ही मोडतोड होत असल्याने “हे सर्व जाणूनबुजूनच सुरू आहे का?” असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. नगरपालिकेच्या मालकीच्या वस्तूंची उघडपणे तोडफोड होत असताना प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याची टीका होत आहे.

पेणमधील हा थीम पार्क सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असल्याचे बोलले जाते. मूळ आराखड्यानुसार काम झाले नसल्याचे आरोप असून, करण्यात आलेल्या कामांमध्येही अनियमितता असल्याची चर्चा आहे. शहरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे एकमेव ठिकाण असलेल्या या पार्कमध्ये प्रशासनाच्या काळात गरज नसताना विविध कामे हाती घेण्यात आल्याचा आरोप आहे.

विशेषतः हिरव्या गवताच्या लॉनवर थेट सिमेंट काँक्रेट टाकण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. ज्या ठिकाणी लहान मुले खेळत होती, ज्येष्ठ नागरिक फिरत होते, त्या जागेचेच स्वरूप बदलण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर झाडांच्या भोवतीही काँक्रिटीकरण करण्यात आल्याने पर्यावरणाबाबतची बेफिकिरी उघड झाली आहे.

या सर्व प्रकारामुळे “नेमकं कोणासाठी आणि कशासाठी हे काम सुरू आहे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठीच ही कामे केली जात आहेत का? अधिकारी वर्ग आणि ठेकेदार यांच्यातील साटेलोटे तर नाही ना? अशा शंका नागरिक मांडत आहेत.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत या मुद्द्यावर जोरदार चर्चा रंगली. गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी बांधकाम विभागाच्या कामकाजावर कडक शब्दांत टीका करत अभियंत्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तर नगरसेवक भूषण कडू यांनीही गेल्या काही दिवसांपासून शहरातील बाग-बगिच्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला आहे.

सभेदरम्यान काही नगरसेवकांनी या मुद्द्यावरून वाद घालत विरोधी बाजू दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला. त्यामुळे अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. एकूणच, थीम पार्कमधील मोडतोड, अनावश्यक काँक्रिटीकरण आणि प्रशासनाची भूमिका यामुळे पेण नगरपालिकेचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Exit mobile version