कर्जतच्या जिते-कुंभे परिसरात बिबट्याचा वावर

वन विभागाकडून सतर्कतेचे आवाहन

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील जिते व कुंभे गावांच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून, वन विभागाने स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावराबाबत कुजबूज सुरू होती. मात्र, ग्रामस्थ अंकुश शेळके यांनी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याची माहिती वन विभागाला दिल्यानंतर या बाबीची अधिकृत दखल घेण्यात आली.

अंकुश शेळके यांच्या फार्महाऊसवर काम करणारे आकाश मिरकुटे यांनी सकाळी फार्महाऊसच्या गेटजवळ काही संशयास्पद ठसे पाहून त्यांचे छायाचित्र मालकाला पाठवले. त्यानंतर शेळके यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधत जिते-कुंभे परिसरातील स्मशानभूमी व नदीकाठच्या भागात बिबट्याचा वावर दिसून आल्याची माहिती दिली.

या माहितीची गांभीर्याने दखल घेत प्रभारी वनक्षेत्रपाल सुरेश भुजबळ यांनी आपले पथक तात्काळ कुंभे येथे पाठवले. नेरळचे वनपाल चव्हाण यांनी वनरक्षक व वनमजुरांच्या मदतीने संपूर्ण परिसराची पाहणी केली. पाहणीदरम्यान बिबट्याच्या खुणा व पावलांचे ठसे आढळून आले असून, जाते गावच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात ठसे सापडल्याने या परिसरात बिबट्याचा वावर निश्चित झाल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

हा परिसर माथेरानच्या जंगलालगत असून, समोरच उल्हास नदीचे पात्र असल्याने, रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी बिबट्या या भागात आला असावा, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. वनपाल चव्हाण यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत रात्री एकटे घराबाहेर न पडणे, नदीकाठी व जंगलालगत विशेष काळजी घेणे, तसेच पाळीव प्राण्यांची सुरक्षा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, वन विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, ग्रामस्थांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बिबट्या हा वन्यप्राणी असून, मनुष्यवस्तीजवळ असल्यास नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. रात्री एकटे बाहेर पडू नये, जंगल व नदीकाठ परिसरात विशेष काळजी घ्यावी. पाळीव प्राण्यांची योग्य सुरक्षा करावी. घराभोवती कचरा साचू देऊ नये. अत्यावश्यक असल्यास रात्री घोळक्याने बाहेर पडावे व आवाज करून चालावे. बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभाग, पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा व लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

फार्महाऊसवर काम करणारे आकाश मिरकुटे यांनी सकाळी फार्महाऊसच्या गेटजवळ काही संशयास्पद पावलांचे ठसे पाहिले. त्यांनी त्वरित त्याचे फोटो मला पाठवले. त्यानंतर मी कर्जत वन विभागाशी संपर्क साधला. वनपाल चव्हाण आपल्या पथकासह घटनास्थळी आले व नदीकाठचा परिसर तसेच मुख्य रस्त्यांची पाहणी केली. या ठिकाणी बिबट्याचे स्पष्ट पावलांचे ठसे आढळले. हा परिसर माथेरानच्या जंगलालगत असून समोरच उल्हास नदी असल्याने, रात्री पाणी पिण्यासाठी बिबट्या येथे आला असावा, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.

-अंकुश शेळके,
ग्रामस्थ

Exit mobile version