इंडिया आघाडीला धडा

दहा साखळी सामने जिंकूनही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. अशा महत्वाच्या स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलिया आपली कामगिरी उंचावतो व टिच्चून खेळतो असे म्हटले जाते. तेच भाजपबाबतही खरे आहे. कोणत्याही निवडणुका ते जोरात लढतातच, पण काही निवडणुका ते अधिक हिरिरीने लढतात. तेच यावेळी दिसले. निवडणुका पाच राज्यांच्या असल्या तरी सर्वांचे लक्ष तीन हिंदी राज्यांवर अधिक होते. आणि, या तीनही राज्यांत भाजपने काँग्रेसला धूळ चारली आहे. राजस्थानमध्ये आपला पराभव होऊ शकतो हे खुद्द राहुल गांधी यांनीच एकदा जाहीर केले होते. छत्तीसगडमध्ये काँग्रेस सहज जिंकेल असे तिच्या विरोधकांनीही वाटत होते. तर मध्य प्रदेशामध्ये काँग्रेसला अनुकूल वातावरण असून भाजपची सत्ता जाणार असा तर्क माध्यमांमधून केला जात होता. मतदानोत्तर चाचण्यांमध्येही हेच म्हटले गेले होते. राजस्थानात गोष्टी अपेक्षेनुसार घडल्या. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील पराभव मात्र काँग्रेसलाच नव्हे तर राजकीय निरीक्षकांनाही हादरा देणारा ठरला. शिवराजसिंग चौहान यांच्याविषयी जनतेत मोठी नाराजी आहे असा एक सार्वत्रिक समज होता. गेल्या वेळी काँग्रेस विजयी झालेली असताना भाजपने फोडाफोडी करून आपले सरकार आणल्याने लोकांमध्ये काँग्रेसविषयी सहानुभूती आहे असे काहींचे म्हणणे होते. काँग्रेसला यंदाच्या प्रचारात जो प्रतिसाद मिळत होता त्यावरून ते खरे असावे असा बहुतेकांचा समज झाला. पण सभांमधील गर्दी आणि मतदान यांचा थेट संबंध नसतो हे पुन्हा एकवार दिसून आले. महिलांना थेट पैशांची मदत देणारी लाडली योजना, प्रेमळ मामा अशी प्रतिमा आणि फार मोठे भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहारांचे आरोप नसणे या चौहान यांच्या जमेच्या बाजू ठरलेल्या दिसतात. याउलट, कमलनाथ आणि दिग्विजयसिंग यांनी साधूमहाराजांचे सत्कार इत्यादी बरेच हिंदुत्ववादी चाळे केले. पण शेवटी ते अयशस्वी ठरले.

चौहानांचा मोदींना धक्का
शिवराजसिंह चौहान यांची प्रतिमा मवाळ अशी आहे. नरेंद्र मोदींना आव्हान देणाऱ्या सुषमा स्वराज यांचे ते समर्थक होते. यंदा त्यांना डावलण्याचा भरपूर प्रयत्न झाला. उमेदवारांच्या पहिल्या यादीत चौहान यांचे नाव नव्हते. अमित शाह आपल्या भाषणात त्यांचा उल्लेख करीत नसत. पुढचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव जाहीर करण्याचे भाजप नेत्यांनी टाळले. पण शेवटी काँग्रेस भारी पडते आहे असे वाटल्यावर चौहान यांना पूर्ववत प्रसिध्दी दिली जाऊ लागली. त्यामुळे मध्य प्रदेशातील यश हे मोदींइतकेच चौहान यांचेही आहे व चौहान यांनी पक्षश्रेष्ठींना दिलेला हा हलकासा धक्का आहे असे म्हणावे लागेल. राजस्थानात देखील भाजपने वसुंधराराजे यांना बाजूला ठेवले. त्यांच्या अनेक समर्थकांना नाइलाजाने उमेदवारी दिली. मात्र तेथे विद्यमान काँग्रेस सरकारविरुध्द बोलायचे असल्याने मोदी व शाह यांच्यासाठी प्रचार सोपा होता. तेथे भाजपने कन्हैय्यालाल नावाच्या तरुणाच्या मुस्लिमांकडून झालेल्या हत्येचा मुद्दा बराच लावून धरला व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भावना भडकावण्याचा प्रयत्न केला. त्याचा त्यांना चांगला उपयोग झालेला दिसतो. छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांच्या काँग्रेस सरकारबद्दलचे जनमत चांगले होते. शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतच्या किंवा महिलांसाठीच्या त्यांच्या योजनांची तारीफ झाली होती. पण शेवटच्या टप्प्यात महादेव एपचे प्रकरण काढून बघेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. त्याकामी ईडीचा वापर केला गेला. त्याचा थोडा फटका त्यांना बसलेला दिसतो. वास्तविक या राज्यात भाजपकडे सशक्त नेता नव्हता. प्रचारात मोदी व शाह हे अग्रेसर होते. तरीही भाजपने अनपेक्षित विजय खेचून आणला. या तीनही राज्यांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून संस्थानिकांचा वरचष्मा आहे. ग्वाल्हेर, इंदूर, जयपूर, जोधपूर इत्यादी भागातील संस्थानिकच नंतर राजकीय नेते झाले. यांचा कल पूर्वापार जनसंघ व भाजपकडे होता. त्यामुळे भाजपची या भागात चांगली मुळे रुजलेली आहेत. त्यामुळेच सत्तेतून गेला तरी भाजप येथे जनतेतून नाहीसा होत नाही.

दक्षिण अजून दूरच

आज काँग्रेस हरलेली असली तरी हीच गोष्ट काँग्रेसबाबतही खरी आहे. या तीनही राज्यांमध्ये जागा घटल्या असल्या तरी काँग्रेसला सुमारे चाळीस टक्क्यांच्या आसपास मते मिळालेली आहेत. हा मतदार अधिक बळकट करणे आणि भाजपचा मतदार आपल्याकडे वळवणे यासाठी त्या पक्षाला पुढच्या काळात प्रयत्न करावे लागतील. एकेकाळी आंध्र प्रदेश हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तेलंगणाच्या निर्मितीनंतर काँग्रेस संपल्यात जमा झाली. पण त्या पक्षाचा मतदार संपलेला नव्हता. तोच मतदार काँग्रेसकडे परत आल्यानेच चंद्रशेखर राव यांच्या पक्षाची मोठी पीछेहाट झालेली दिसते. राव यांच्या रयतु बंधू योजनेमुळे श्रीमंत शेतकऱ्यांना अधिक फायदा झाला अशी तक्रार होती. तसेच सरकारी नोकरभरती थांबल्याने तरुण अस्वस्थ होते. त्याचा फटका त्यांना बसला. तेलंगणात खरी लढत बीआरएस व आपल्यात आहे असे भासवण्याचा भाजपचा प्रयत्न पूर्णपणे तोंडावर आपटला आहे. प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी हे मूळचे काँग्रेसचे नाहीत. पण तरीही काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्यावर भरवसा टाकला व इतर नेत्यांनी त्यांना मारुन मुटकून का होईना पण साथ दिली. कर्नाटकापाठोपाठ भाजपचा हा दुसरा मोठा पराभव असल्याने दक्षिण भारत भाजपसाठी अजूनही अप्राप्यच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने उत्तर भारतातील हिंदी प्रदेश आणि दक्षिणेकडील राज्ये यांच्यात असलेली राजकीय मतभेदाची रेषा स्पष्ट झाली आहे. गायपट्ट्यावर भाजपचे वर्चस्व असले तरी दक्षिणेतील पुढारलेली, अधिक साक्षर आणि अधिक सधन राज्ये भाजपला लांब ठेवू पाहत आहेत असा संदेश या निकालाने दिला आहे. या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी मतदारांना अनेकानेक फुकट गोष्टींची आमिषे दाखवली होती. त्यापैकी कोणत्या आमिषांचा विजय झाला याचा तौलनिक अभ्यासच करावा लागेल. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला हरवणे हे विरोधकांसाठी आता अधिक कठीण होईल. इंडिया आघाडीला आपल्या डावपेचांची नव्याने आखणी करावी लागेल. काँग्रेसला इतर पक्षांना अधिकाधिक बरोबर घेऊन चालावे लागेल. आघाडी टिकवून एकसंधपणे काम करावे लागेल.

Exit mobile version