| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
घराजवळ भटका कुत्रा चावल्याने जखमी झालेल्या 10 वर्षाच्या चिमुकलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज (दि.25) नागांव ता.अलिबाग येथे घडली. चिमुकलीच्या अशा करुण अंतामुळे संपूर्ण नागांव ग्रामस्थ हळहळ व्यक्त करीत आहेत.
स्वरा वैभव घाडी असे या मुलीचे नाव आहे. नागाव हायस्कूल समोरील मांद्रेकर वाडी येथे ती राहत असून इयत्ता चौथी मध्ये शिकत होती. काही दिवसांपूर्वी तिच्या घरासमोरच एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला होता. त्याने केलेल्या दंशामुळे तिला जखम झाली होती. त्यावरचे उपचार घेत रेबीजचे लसीकरण देखील पूर्ण झाले होते. मात्र तिला जास्त त्रास होत असल्याने मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले होते. तथापि उपचाराला साथ न दिल्याने तिचा आज सकाळी मृत्यू झाला.