। नागोठणे । प्रतिनिधी ।
नागोठण्यातील जुन्या पुलावरून पाय घसरून पडल्याने 57 वर्षीय इसम अंबा नदीच्या पात्रात गेला वाहून गेला. ही घटना शनिवारी (दि.23) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. अनवर शेख असे वाहून गेलेल्या इसमाचे नाव असून नदीच्या पात्रात अनवर शेख यांची शोध मोहीम सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यांचा तपास लागलेला नाही.
व्यवसायाने चालक असलेले अनवर शेख हे शनिवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास वरवठणेकडून नागोठण्यात येत होते. दरम्यान अंबा नदीवरील जुन्या पुलावरून येत असताना पुलाच्या मधोमध आल्यानंतर अनवर यांचा पाय घसरून ते खाली पडले. मात्र त्यांना पुलाच्या पिलरचा आधार मिळाल्याने ते पिलरला पकडून थोडा वेळ उभे राहिले. त्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांकडून अनवर यांना दोर टाकून पुलावर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, दोरीला पकडून वर येत असतानाच अनवर यांच्या हातातून दोर सुटला आणि ते नदीपात्रात वाहून गेले. त्याचवेळी तेथे उपस्थित असलेले पोलीस हे. कॉ. प्रकाश हंबीर यांनी नदीच्या पात्रात उडी घेऊन अनवर याला वाचविण्याचे प्रयत्न केले; मात्र ते अनावर यांना वाचविण्यात अपयशी ठरले. त्यानंतर एसव्हीआरएसएसची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होत त्यांच्याकडून अनवर यांचा शोध सुरू आहे.







