आंबा कलम कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना धडे

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।

भारत हा कृषिप्रधान देश आहे. पर्यावरण रक्षण काळाची गरज आहे. येणार्‍या काळात शेतीचे महत्त्व लक्षात घेता विद्यार्थ्यांना बागकाम व शेतीकाम येणे गरजेचे आहे. यादृष्टीने कलम करण्याचे कौशल्य शिकल्यास ते स्वतः रोपवाटिका तयार करू शकतात. नॅशनल स्किल कॉलिफिकेशन् फ्रेमवर्क या उपक्रमांतर्गत राजिप शाळा सिद्धेश्‍वर येथे जनार्दन भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे गट पाडून आंबा कलम कार्यशाळा घेण्यात आली.

यावेळी जनार्दन भिलारे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, हा पर्यावरण स्नेही उपक्रम विद्यार्थांना खूप आवडला. नॅशनल स्किल कॉलिफिकेशन् फ्रेमवर्क अंतर्गत हा उपक्रम शाळेत आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सर्व विद्यार्थांना माळी काम शिकविले जाते. यात मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना उस्फुर्तपणे माळी काम हा विषय शिकवतात. यामुळे मुलांना पर्यावरणाची आवड निर्माण झाली आहे. शाळेतील काही विद्यार्थी स्वतः कलम तयार करतात. याबाबतचे व्हिडिओ यू ट्यूबवर टाकले असून ते पाहून आपणही कलम करू शकता, असेही भिलारे यांनी सांगितले आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका रोहिणी खामकर तसेच शिक्षका स्वप्नाली मेमाणे, प्रिया काळे यांनी खूप मेहनत घेतली होती. या उपक्रमाचे शिक्षणाधिकारी रायगड पुनिता गुरव, जिल्हा कार्यकारी रत्नशेखर गजभिये, गट शिक्षणाधिकारी साधुराम बांगारे, केंद्रप्रमुख कैलास म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र यादव, उपाध्यक्षा तेजस्विनी गायकवाड व सर्व सदस्य तसेच सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

आंबा कलम कृती
आंबा कलम करण्यासाठी एक गावठी आंबा झाड व कलम पट्टी, कलम काडी, ब्लेड, प्लास्टिक बॅग हे साहित्य लागते. प्रथम गावठी झाडाचा शेंडा कट करून घ्यावा. यानंतर कलम काडीला 2 इंच आकार देऊन गावठी आंब्यावर 2 इंच छेद करा. आकार दिलेली कलम काडी गावठी आंब्यावर घट्ट बसविल्यानंतर कलम पट्टीच्या साह्याने घट्ट बांधा. तयार झालेल्या आंबा कलमावरून लहान प्लॅस्टिक बॅग टाकून खाली धागा बांधा.
Exit mobile version