मराठी माणसाने स्वाभिमान बाळगावा- वाणी

पीएनपी महाविद्यालयात मराठी पंधरवडा साजरा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

प्रत्येक मराठी माणसाने स्वाभिमान बाळगणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नेने महाविद्यालयाचे निवृत्त प्रा. जनार्दन वाणी यांनी केले. पीएनपी महाविद्यालयात मराठी पंधरवडा साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी वांडमय विभागातर्फे माझ्या मराठाची बोलु कवतुके ही स्वरचित काव्य वाचन आणि सादरीकरणाची स्पर्धा मराठी पंधरवड्यानिमित्त घेण्यात आली. यावेळी प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, महाविद्यालयाचे संचालक प्रा. विक्रांत वार्डे, मराठी विभाग प्रमुख प्रा. नम्रता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. वाणी यांनी आपल्या मनोगतामध्ये मराठी भाषेच्या स्थितीगतीवर लक्ष केंद्रित केले. दूरदर्शनवर दिसणार्‍या विविध मालिकांमध्ये मराठी भाषा चुकीच्या पद्धतीने सादर होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे प्रत्येक मराठी माणसाने मराठी बोलले पाहिजे, रोजचे दैनंदिन व्यवहार हे मराठीतच केले पाहिजे तरच मराठी अजून समृद्ध होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

प्रा.विकांत वार्डे यांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांच्या मराठीतील विविध स्वरचित कविता सादर करून त्यांचा उलगडा केला आणि उपस्थितांची मने जिंकली. प्रभारी प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी आपल्या वक्तव्यामध्ये मराठी भाषेच्या भवितव्याची उगीचच धास्ती करू नये असे मत प्रतिपादन करत उपस्थित विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. चित्रपट, संगीत, साहित्य, शैक्षणिक आदी क्षेत्रांमध्ये मराठी सारस्वत अग्रेसर आहेत आणि राहतील, यावर आपले मत व्यक्त केले.

मराठी विभाग प्रमुख प्रा. नम्रता पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. या कार्यक्रमांतर्गतच मराठी काव्यवाचन आणि सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. मानसी नागावकर, द्वितीय क्रमांक कु. सलोनी, तृतीय क्रमांक कु.वैष्णवी नागावकर तर उत्तेजनार्थ कु.महेश हे विद्यार्थी यशस्वी ठरल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी कु. तेजस पाटील याच्या गझल सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढली. विद्यार्थ्यांच्या या उत्साहात प्रा. रूपाली पाटील, प्रा. केतकी पाटील, प्रा. पूजा पाटील, प्रा. मिलिंद घाडगे, प्रा. नम्रता पाटील, प्रा. विक्रांत वार्डे, डॉ. ओमकार पोटे या शिक्षकांनीही आपापल्या कविता सादर केल्या.

काव्यवाचन स्पर्धेसाठी डॉ. रसिका म्हात्रे आणि प्रा. दिनेश पाटील यांनी परीक्षण केले. तर सूत्रसंचालन मराठी विभागाच्या प्रा. रुपाली पाटील केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख नम्रता पाटील यांसह रूपाली पाटील प्रा मिलिंद घाडगे, प्रा. साईनाथ पाटील, प्रा. मंदार पाटील, प्रथमेश पाटील, सागर पालकर, शलाका पंडित, सुबोध पाटील, सुनील पाटील, प्रितेश पाटील, जितेंद्र पाटील, प्रत्युष काते आदींनी मेहनत घेतली.

Exit mobile version