चौदा तासानंतर दरड हटविण्यास प्रारंभ; पावसाचा अडथळा
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर कशेडी घाटात धामणदिवी व चोळई गावाजवळील हॉटेल अन्नपूर्णा समोरील डोंगरावरून प्रचंड मोठी दरड कोसळली. ही घटना मंगळवारी (दि.14) रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली असून मुंबई लेनवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी तब्बल 14 तासांनंतर लार्सन अँड टुब्रो ठेकेदार कंपनीने दरड हटविण्यास सुरुवात केली. मात्र, दुपारी दीड वाजता सुरू झालेल्या पावसामुळे कामात काहीकाळ पावसाचा अडथळा निर्माण झाला.
मंगळवारी रात्री पडलेल्या या महाकाय दरडीने मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे व्यापून गेली. रात्री दरडप्रवण क्षेत्रात अधूनमधून दरडी कोसळत असल्याने कशेडी टॅप वाहतूक पोलीस आणि पोलादपूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवला. गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक दुहेरी करून मुंबईकडे जाणारी वाहने गोवा लेनवर वळविण्यात आली.
पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे व महाड प्रांताधिकारी डॉ. पोपट ओमासे यांनी घटनास्थळी पाहणी करून कशेडी घाटातील वाहतूक पोलीस आणि पोलादपूर पोलिसांना वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना करण्याची सूचना केली.
यावेळी महाड औद्योगिक वसाहतीतील सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे हेदेखील दरडप्रवण क्षेत्रात हजर झाले. त्यांनी बॅरिकेट्स लावून गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांना सरळमार्गी वाहतूक सुरू करून मुंबईकडे जाणारी वाहने या लेनवरून मार्गस्थ केली. याठिकाणी अपघात झाल्यास क्रेन तसेच अन्य बाबींची तत्परता ठेवण्यात आली. मात्र, रात्री दरड कोसळलेल्या ठिकाणी पुन्हा पुन्हा दरडी कोसळत असल्याने पोलीस आणि वाहतूक पोलीस मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर ठेवत वाहतूक नियंत्रण केले.
बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दरड हटविण्याच्या कामासाठी महामार्गावरील ठेकेदार कंपनी लार्सन अँड टुब्रोकडून सुरुवात झाली. परंतु एखाद्या तासांनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे दरडीतील लाल मातीचा ढिगारा निसरड्या चिखलात रुपांतरीत झाला. त्यामुळे काहीकाळ पावसाचा अडथळा दरड हटविण्याकामी झाला. दोन तासांनी मुंबईकडे जाणारी लेन एकेरी वाहतूकीसाठी खुली करण्यात येऊन दरडीतील लाल मातीचा ढिगारा हटविण्याचे काम संथगतीने सुरू राहिले. कशेडी घाटातील डोंगर लार्सन अँड टुब्रो ठेकेदार कंपनीने उभे कापल्याने वारंवार डोंगरातून लालमातीचे ढिगारे कोसळण्याच्या घटना घडत असल्याचे दिसून आले.






