वाहतुकीला अडथळा; नागरिकांचा मनस्ताप
| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परीसरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून, याची तक्रार सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, या जनावरांचा वेळेत बंदोबस्त न झाल्यास येत्या गणेशोत्सवात रस्त्यांवरील पादचारी व वाहनचालकांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तलवार कायम असणार आहे.
रस्त्यांवर मोकाट सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या जनावरांना अटकाव करण्यात यावा, अशी मागणी कित्येक दिवसांपासून होत आहे. बोर्लीपंचतन गावातून जाणाऱ्या दिघी, श्रीवर्धन मुख्य मार्गावर एक किलोमीटरच्या भागात दिवसरात्र मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. रात्रीच्या वेळी शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर मोकाट गुरे ठाण मांडून असतात. त्यामुळे त्यांना धडकून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. अनेक वेळा वाहतुकीचाही खोळंबा होतो. शहरात गेली अनेक वर्षे मोकाट गुरांचा उपद्रव होत असताना अश्वांसह श्वाणांची ही संख्या वाढत असूनही त्यावर ठोस उपाययोजना होत नाही.
शहरात मोकाट जनावरांचा उच्छाद वाढल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण भर रस्त्यात वारंवार जनावरांच्या धावा-धाव होत असल्याने नागरिकांची धावपळ उडते. यामध्ये बेसावद पादचाऱ्यांना दुखापत झाल्याची अनेक घटना येथे घडल्या आहेत. बोर्लीपंचतन शहरातून जाणाऱ्या मार्गावर मोकाट जनावरांचे वास्तव असल्याने नेहमीच रहदारीला अडथळा होत असल्याने पादचाऱ्यांना उपद्रव सहन करावा लागतो. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.