पोलिसांची गुन्हेगारांवर करडी नजर
| उरण | प्रतिनिधी |
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार उरण पोलिसांनी किनारपट्टीवर सुरक्षा वाढवून तालुक्यातील अनेक भागात मध्यरात्री जोरदार कोंम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. पोलिसांची थाप ही संशयित रहिवाशांच्या दरवाजावर पडल्याने व त्या परप्रांतीय रहिवाशांची झाडाझडती पोलिसांनी सुरु केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी उरण तालुक्यातील परदेशातील नागरीक, परप्रांतीय नागरिक तसेच संशयित वस्तू यांची तपासणी करण्यासाठी किनारपट्टीवर सुरक्षा वाढवून गुरुवारी मध्यरात्री जोरदार कोंम्बिंग आपरेशन राबवून शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व परप्रांतीय नागरिकांच्या संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षितेच्या दुष्टीने एकंदरीत अचानक झालेल्या आणि शिस्तबद्ध वातावरणात झालेल्या झाडाझडतीच्या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसणार असल्याचा विश्वास अनेक स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
उरण तालुक्याला मोठ्या प्रमाणात किनारपट्टी लाभल्याने ही मोहिम अधिक प्रभावी ठरावी यासाठी 3 पोलीस अधिकारी, 30 अंमलदार यांच्या माध्यमातून परप्रांतीय नागरिकांची झाडाझडती सुरू केली असून, परदेशातील नागरीकांचा शोध सुरू केला आहे. तसेच संशयित व्यक्ती, संशयास्पद वस्तू यांची ही झाडाझडती कोंम्बिंग ऑपरेशन राबवून सुरू केली आहे.तसेच अशा प्रकारची कारवाई यापुढे ही सातत्याने सुरू राहणार आहे.
जितेंद्र मिसाळ,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण







