| पनवेल | वार्ताहर |
पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून पडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना तळोजा येथील भुयारी मार्गाजवळ घडली आहे. हर्षदीप पंकज पाटील असे मृत मुलाचे नाव असून, तो तळोजा फेज-1 मधील देव आशिष बिल्डिंगमध्ये कुटुंबासह राहण्यास होता. शुक्रवारी (दि. 18) रात्री 8.30च्या सुमारास दोघे पिता-पुत्र खारघर येथून परतीच्या मार्गावर दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी तळोजा भुयारी मार्गाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या पाण्याच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवर पाठीमागे बसलेला हर्षदीप खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्याअगोदर त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर टँकरचालक पळून गेला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.