। पनवेल । वार्ताहर ।
शेअर्समधील गुंतवणुकीमध्ये जास्त फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सायबर टोळीने नौदलातील सेवानिवृत्त अधिकार्याला 2 कोटी 47 लाख 50 हजारांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणातील टोळीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
फसवणूक झालेले 65 वर्षीय भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी हे खारघरमध्ये राहण्यास आहेत. 25 जानेवारी रोजी सायबर टोळीने त्यांचा मोबाइल नंबर एबीएएनएस प्रो या व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये घेतला होता. शेअर मार्केटमध्ये एबीएएनएस कंपनीचे मोठे नाव असल्याने या नौदल अधिकार्याने व्हॉट्सअप ग्रुपवरील सदस्यांच्या चॅटिंगवर विश्वास ठेवून त्यांनी एबीएएनएस या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा मेसेज त्यांनी ग्रुपवर टाकल्यानंतर सायबर टोळीने त्यांना एक लिंक पाठवून एबीएएनएस प्रो हे अप डाऊनलोड करण्यास सांगितले. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी सायबर टोळीने त्यांना दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सुरुवात केली. 5 फेब्रुवारी ते 27 मार्च या कालावधीत त्यांच्या बचत खात्यातून तब्बल 2 कोटी 47लाख 50 हजारांची रक्कम पाठवली गेली. त्यानंतर त्यांना एबीएएनएस प्रो या अॅपवरील खात्यात तब्बल 39 कोटी 43 लाख 80 हजार रुपये इतका फायदा झाल्याचे दाखवण्यात आले. अधिकार्याने त्यातील 3 कोटी रुपये रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना ही रक्कम काढण्यासाठी 1 टक्के रक्कम सर्व्हिस चार्ज भरावी लागेल असे सांगण्यात आले. मात्र, आपल्याकडे रक्कम नसल्याचे सांगून त्यांना मिळणार्या रक्कमेतून तितकी रक्कम काढून घेण्यास सांगितले. मात्र, सर्व्हिस चार्जेसची रक्कम भरल्यानंतरच त्यांना नफ्याची रक्कम काढता येईल, असे त्यांना सांगण्यात आले. या नौदल अधिकार्याने गुगलवरुन एबीएएनएस या कंपनीचा नंबर शोधून त्यावर संपर्क साधला असता, त्यांची सायबर टोळीकडून फसवणूक झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.