पुलावरुन खुलेआम 30 टनाची वाहतूक सुरू; रेवदंडा पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्षाची चर्चा
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग आणि मुरुड या दोन तालुक्यांना जोडणारा रेवदंडा खाडीवरील साळाव पूल अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल नादुरुस्त झाल्याने पुलाच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, त्याबाबतचे आदेश तत्कालीन रायगड जिल्हाधिकारी यांनीच काढले आहेत. परंतु, जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बिनदिक्कतपणे पुलावरुन 28 ते 30 टन मालाची वाहतूक करण्यात येत आहे. यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या बाजूलाच रेवदंडा पोलिसांची चौकी असून, याठिकाणी दिवस-रात्र पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत असताना ओव्हरलोड वाहतूक होतेच कशी? यावर पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.
डंपरमधून विशेषत: गौण खनिजाची परवानगीपेक्षा दुप्पट क्षमतेने अधिक वजनाची वाहतूक आता सर्रास होत असून, त्यामुळे रस्त्यांची वाट लागत आहे. मात्र, विशिष्ट हेतूने या बेकायदा वाहतुकीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उपप्रादेशिक वाहतूक कार्यालयाच्या नियमानुसार सहा चाकी वाहनांना 10 टन, तर 10 चाकी वाहनांना 16 टन वजनाची वाहतूक करण्याची परवानगी आहे. मात्र, साळाव पुलावरुन फक्त 12 टनापर्यंत वाहतूक करण्यास परवानगी आहे. असे असताना, अधिक फायद्याच्या हेतूने सध्या सहा चाकी वाहनांमधून 18 ते 20 टन, तर 10 चाकी वाहनांमधून 28 ते 30 टन, 12 चाकी वाहनांमधून 40 टनाची वाहतूक केली जात आहे. विशेषत: साळाव कंपनी ते रेवदंडा पुलावरून अलिबाग मार्गावर अशाप्रकारची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु असून, त्यामध्ये साळाव कंपनीचा कच्चा मटेरियल, तसेच खडी, मुरुम, डबर, वाळू अशा गौण खनिजाचा त्यामध्ये समावेश आहे. अशा प्रकारे बेकायदेशीरपणे जादा क्षमतेची वाहतूक होत असून, परिणामी रेवदंडा साळाव पुलाला धोका निर्माण झाला आहे. अगोदरच हा पूल कमकुवत झाला आहे. त्याचे जॉईंट, जॅक कमकुवत झालेले आहेत, कधीही पुलाला धोका निर्माण होऊन पूल तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच्यावरून अनधिकृत जड वाहनांमुळे कंटेनर, मोठमोठे डंपर, ट्रक सुमारे 30 ते 35 टन ओव्हरलोड साळाव पोलीस चेक पोस्टवरून खुलेआम ट्रॅफिक पोलिसांच्या समोर जड वाहतूक होत असते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम रेवदंडा-अलिबाग मार्गावर होत असून, ठिकठिकाणी रस्त्याची चाळण झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच साळाव ते रोहा रस्त्याचे काम सुरू असल्याचे बहुतेक सर्व ओव्हरलोड वाहतूक साळाव-रेवदंडा पुलावरून वळवून पुलाला धोका निर्माण झाला आहे.
साळाव पुलावरुन होणार्या ओव्हरलोड वाहतुकीबाबत मला काही माहीत नाही. माहिती घेऊन याबाबत तुम्हाला सांगण्यात येईल.
श्रीकांत किरवले,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, रेवदंडा
परवानगी 12 टनाचीच
साळाव पूल नादुरुस्त झाल्याने मागील दोन वर्षांपासून त्याच्या डागडुजीचे काम करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत पुलावरुन 12 टन मालाची वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, नियम धाब्यावर बसवून पोलिसांच्या समोरुन दररोज 30 टन वजनाची वाहतूक सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पुलावरुन ओव्हरलोड वाहतूक करण्यास बंदी आहे. तसे परिपत्रक जाहीर केले आहे. परंतु, तरीसुद्धा नियमांचे उल्लंघन करुन ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्यास कारवाई करण्यात येईल.
डोंगरे,
सा.बां. विभाग अधिकारी