माजी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना करिअरची नवी दिशा

| अलिबाग | प्रतिनिधी |

जनता शिक्षण मंडळाचे ॲड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ, अलिबाग येथील आय.क्यू.ए.सी. आणि करिअर गाईडन्स सेल तसेच अल्युमनी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशस्वी माजी विद्यार्थ्यांसह संवाद हा कार्यक्रम जयवंत केळूसकर सभागृह येथे उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी, असा संदेश देण्यात आला.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील आणि उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रभारी प्राचार्य डॉ. नीलम हजारे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवातून प्रेरणा घेऊन आपल्या करिअरची दिशा निश्चित करावी आणि स्पर्धात्मक युगात आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन केले. या प्रसंगी माजी विद्यार्थी सनदी लेखापाल प्रज्ञा शिरधणकर, ॲड. सौरभ पाटील आणि राकेश सावंत यांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक अनुभवांद्वारे विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी टॅक्स आणि कायदा यांचा परस्पर संबंध स्पष्ट करताना कायदेशीर भाषा, कायद्याचा अर्थ लावणे, बेअर ॲक्ट वाचणे तसेच सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे पूर्वनिर्णय अभ्यासणे हे विधी शिक्षणासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांनी कायद्यातील संज्ञांचे अचूक अर्थ समजून घेणे आणि विविध कायदे व अधिनियमांतील कलमांचा सखोल अभ्यास करणे हे यशस्वी विधीज्ञ होण्यासाठी आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. तसेच ड्राफ्टिंग आणि प्रभावी सादरीकरण कौशल्ये विकसित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

Exit mobile version