बागायतदारांवर नवे संकट

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

थंड आणि ढगाळ वातावरणामुळे रोहा आणि मुरूड तालुक्यातील परिसरात असणाऱ्या काजू आणि आंबा पिकावर तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती रोहा तालुक्यातील गोपाळवट गावचे शेतकरी जानू दुसार यांनी दिली. तुडतुड्याची अळी आंबा अथवा काजूच्या बुंध्यापासून वर चढत जाऊन मोहोर फस्त करीत असते. त्यामुळे वेळोवेळी अशा पिकांवर कीडनाशक फवारणी करावी लागते, अशी माहिती दुसार यांनी दिली.

या पिकांसाठी वातावरण अनुकूल असले तरी अधूनमधून वातावरणात अवकाळी पाऊस, हवामानात विचित्र बदल होत आहे. कधी थंडी तर कधी तापमानाचा पारा वाढत आहे. धुकेदेखील पडत आहे. या काळात तुडतुड्याची कीड अळी घालण्यासाठी झाडाच्या टोकाला जात असते. त्याचा परिणाम आंबा किंवा काजूवर होतो, अशी माहिती दुसार यांनी दिली. यामुळे आंबा मोहोरदेखील गळून पडत असतो. गोपाळवट हे मुरूड-रोहा तालुका सीमेवर असणारे डोंगरी गाव असले तरी येथे आंबा, काजू अशा बागा अनेकांनी खरेदी केलेल्या आहेत. फार्म हाऊस बांधलेले आहेत. उंचीवर असूनही येथे नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत. रोहापर्यंत येथील बहुतांश भाग जंगल क्षेत्र असून, मार्गावरील म्हसाडी, केळघर, तांबडी, कांटी बोडण, वांदरकोंडा, आराळी, वाघीर पट्टी, धनगर वाडी, टिटवी आदी पंचक्रोशितील परिसरात आंबा, काजू, केळी, नारळ, सुपारीचे पीक घेतले जाते.

ढगाळ वातावरणाचा आंबा, काजू, शेवगा, वाल पिकाला मोठा फटका बसू शकतो, अशी माहिती देताना वाणदे येथील शेतकरी तुकाराम पाटील यांनी दिली. ते म्हणाले की, हवामानात आंबा मोहोर, शेवग्याच्या फुले, काजू मोहोर, वाल पीक काळवंडते. त्यामुळे धास्तावलेल्या आंबा बागायतदारांनी आणि शेतकऱ्यांनी अनेक ठिकठिकाणी कीड प्रतिबंधक कीटकनाशके फवारणी सुरू केली असल्याचे तुकाराम पाटील आणि जानू दुसार यांनी सांगितले.

गोपाळवट हा भाग जरी रोहा तालुक्यात असला तरी मुरूड ते केळघर अशी एसटी सेवाच केवळ उपलब्ध आहे. त्यामुळे येथील शेतकरी खते किंवा पिकांवर फवारण्यात येणारी कीटकनाशके खरेदीसाठी मुरूड येथील सुपारी खरेदी विक्री संघात जातो, अशी माहिती जानू दुसार यांनी दिली.
Exit mobile version