उद्यापासून निवडणूक आयोगात ठाकरे विरुद्ध शिंदे लढाईचा नवा अंक

। मुंबई । वृत्तसंस्था ।

उद्यापासून केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटात सामन्याचा नवा अंक रंगणार आहे. शिंदे गटाला आयोगाकडे धाव घेण्याचा हक्क नाही, अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. तर दोन्ही गटांना बाजू मांडण्यासाठी 8 ऑगस्टपर्यंतची वेळ मिळाली होती. सुप्रीम कोर्टानंतर आता शिवसेना विरुद्ध शिंदे गट या लढाईचा दुसरा अंक उद्यापासून निवडणूक आयोगात रंगणार आहे.

निवडणूक आयोगात शिवसेना उद्या पहिली मागणी स्थगितीचीच करणार असल्याची माहिती आहे. सुप्रीम कोर्टाची सुनावणी सुरू असताना आयोगानं निर्णयाची घाई करू नये ही शिवसेनेची विनंती असणार आहे. शिवसेना पक्षाची घटना, गेल्या काही वर्षातल्या पक्षांतर्गत निवडणुकांचा इतिहास, त्या त्या पदांची जबाबदारी याचा गोषवारा निवडणूक आयोगाकडे सादर होणार आहे.

शिंदे गटाचे जे लोक आयोगासमोर आले आहेत त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार, त्यामुळे त्यांना आयोगाकडे दावा करण्याचा हक्कच नसल्याचा शिवसेनेचा युक्तिवाद आहे. आठ ऑगस्टपर्यंत दोन्ही बाजूंना आपापली बाजू मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ दिला होता. सुप्रीम कोर्टाने आयोगाच्या कार्यवाहीला थेट स्थगिती दिलेली नाही.

Exit mobile version