राज्य लोकसेवा आयोगाचे परीक्षेतील यशस्वी तरुणाचा पुढाकार
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या नांदगाव ग्रामपंचायतमधील ऐनाचीवाडी येथे महिला शिक्षित व्हाव्यात यासाठी रात्र शाळा चालवली जाते. या शाळेचे व्यवस्थापन राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा यशस्वी झालेला एक आदिवासी तरुण करीत आहे.
कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील ऐनाचीवाडी येथे महाराष्ट्र राज्य कर सहायकआयुक्त नयन वाघ यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी रात्रशाळेचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झालेल्या या तरुणाने आपल्या भागातील महिला शिक्षित झाल्या पाहिजेत यासाठी शिक्षणापासून वंचित राहिलेल्या महिलांना साक्षर करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. आदिवासी समाजातील तरुण नयन वाघ हे 2024मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले असून, एप्रिल 2026मध्ये त्यांच्याकडे राज्य कर सहायक आयुक्त पदावर काम करण्याची नियुक्ती मिळाली आहे. क्लास वन अधिकारी नयन वाघ यांनी आपल्या सामाजिक जाणिवेतून ‘धरती आबा बिरसा मुंडा ॲकॅडमी’च्या सुरू केली आहे. त्यांच्या पुढाकाराने आणि माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना पोलीस भरती आणि एमपीएससी परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. त्यानंतर आता त्यांनी गावातील अशिक्षित महिलांसाठी रात्रशाळा सुरू करून साक्षरतेचा जागर सुरू केला आहे.
या रात्रशाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून जबाबदारी पूनम नयन वाघ पार पाडत आहेत. आदिवासी वाडी मधील दहावी बारावी शिक्षण घेतलेल्या नयना वाघ, मोनिका वाघ आणि करूणा मुकणे या सहशिक्षिका म्हणून योगदान देत आहेत. महिलांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेली कौशल्ये मिळावीत, शासनाच्या योजना यांची माहिती व्हावी. बँकेचे आर्थिक व्यवहार करता यावेत तसेच ग्रामसभेत सहभाग घेता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एक महिला साक्षर झाली तर संपूर्ण कुटुंब साक्षर होते, या विचारातून रात्रशाळा सुरू करण्यात आली.
