| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरातील वाढते पर्यटन या अनुषंगाने अरूंद रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी, या समस्येवर लवकरच तोडगा निघत असून, एक दिशा मार्गाचा (वन – वे) अवलंब करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, भगवान महावीर मार्ग, जुने बसस्थानक तसेच टिळक रस्ता या सतत रहदारीच्या परंतु अरूंद रस्त्यांवर वाहतूक कोंडी समस्येने स्थानिक तसेच पर्यटक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातही शालेय सहली आणि खासगी बसेस शहरात आल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. अनेकवेळा वाहतूक कोंडीचे पर्यावसन वादावादी होताना दिसते. या बाबतीत श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी वाहतूक कोंडी समस्येवर तोडगा काढला असून शहरात लवकरच एक दिशा मार्गाचा अवलंब करण्यात येणार आहे, असे सांगितले. शहरात एसटी बस ज्या मार्गावरून गावात फेरी घेत गावातून मार्गस्थ होते तोच मार्ग वन-वे करीता ठेवण्यात येणार आहे, असे सांगितले.
श्रीवर्धन गावात येणारी वाहने ही छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे भगवान महावीर मार्ग, जुने बसस्थानक, प्रभू आळी मार्गे गावात प्रवेश करतील व गावातून बाहेर जाणारी वाहने ही टिळक रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने मार्गस्थ होतील. या बाबतीत सर्वांचे सहकार्य लाभले तर वाहतूक कोंडी समस्या निर्माण होणार नाही.
-सुरेंद्र गरड, पोलीस निरीक्षक
श्रीवर्धन पोलीस ठाणे






