मुरुडला चित्रबद्ध करणार मुंबईचे चित्रकार

| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |

मुरुडला बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील कला अकादमीतर्फे महापालिका कलाशिक्षक व ख्यातमान चित्रकार यांच्यासमवेत मुरुड, जंजिरा व परिसरात आर्टिस्ट कॅम्प दि. 29, 30 नोव्हेंबर, 01 व 02 डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मुरुडला निसर्गाने इतकं सुंदर बनवले आहे की, कोणत्याही कोपरीवर उभे राहा तुम्हला निसर्ग हिरवाईने नटलेला दिसणार, पारंपरिक वेशभूषा, ऐतिहासिक जलदुर्ग, गारंबीसारखे जलस्तोत्र, नवाबी राजवाडे आणि स्वच्छ सुंदर विशाल समुद्रकिनारा यांचे चित्र पुढील तीन दिवस मुंबईचे 20 चित्रकार काढणार आहेत. पहिल्या दिवशी चित्रकार गणेश हिरे यांच्या प्रात्यक्षिकाने या कार्यक्रमाची सुरूवात झाली.

या कॅम्पमध्ये समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ले ,कोळीवाडा, ग्रामीण जीवन अशा विविधतेने नटलेल्या वेगवेगळ्या नयनरम्य ठिकाणी प्रत्यक्ष चित्रणाची संधी सहभागी कला शिक्षकांना उपलब्ध होईल. या कॅम्पमध्ये तयार करण्यात आलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन दि. 05 ते 11 मार्च 2024 या कालावधीत नेहरु सेंटर कलादालन, वरळी येथे भरविण्यात येणार आहे.

या कॅम्पचे आयोजन शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी माध्यमिक राजू तडवी व उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे यांच्या मार्गदर्शनाखाली कला प्राचार्य दिनकर पवार यांनी निदेशक मंजिरी राऊत, भूषण उदगीरकर, योगेश मोरे, प्रफुल्लता कुंभार व निनाद पाटील यांच्या सहकार्याने केले आहे. यासाठी स्थानिक कलाकार संतोष बळी यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version