| खोपोली | प्रतिनिधी |
शेकापक्ष नेहमीच प्रवाहविरोधात राहून तळागळातील शेतकऱ्यांसाठी प्रास्थापितांच्या विरोधात लढत आलेला पक्ष आहे. म्हणूनच आडलेला, नडलेल्या, गरजूंचा पक्ष म्हणून शेकापची ओळख असल्याचे शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम यांंनी रोजगार मेळाव्यात बोलताना सांगितले.
खोपोलीत रोजगार मेळाव्याचे आयोजन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार अतुल म्हात्रे यांच्या संकल्पनेतुन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा महिला अध्यक्षा शिवानी जंगम बोलत होत्या. एक उमेदवार आमदारकीची निवडणूक लढतो. अपयश आल्यावर तो अज्ञातवासात न जाता उत्तर रायगडभर रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम राबवितो अशी स्तुती शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार अतुल म्हात्रे यांची शिवानी जंगम यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या की, शिक्षण महाग झाल्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढले जाते. आईवडिलांना एक आशा आहे की शिक्षणानंतर चांगली नोकरी लागेल, परंतु नोकरी मिळत नसल्यामुळे मोबाइल खेळून फुकटचा डाटा वापरत आहेत. म्हणूनच इंजिनियर झालेला मुलगा पोटासाठी मिळेल ते काम करीत आहे. खालापूर तालुक्यात मोठमोठे कारखाने असतानाही 50 टक्के तरूण बेरोजगार आहेत. शेकापक्ष नुसता रोजगार मेळावा घेवून थांबणार नसून सातत्याने पाठपुरावा करून प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल यासाठी लढणार आहे, असा विश्वास उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवानी जंगम यांनी दिला. आजची महिला सर्व जबाबदाऱ्या खांद्यावर घेण्यासाठी ठाम उभी आहे, याची प्रचिती रोजगार मेळाव्यात मुलींची संख्या बघून आल्याचेही शिवानी जंगम यांनी बोलताना सांगितले.







