| पनवेल ग्रामीण | दीपक घरत |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि सर्व राजकीय पक्षांनी आंदोलन करीत सरकारला इशारा दिला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देणार अशी घोषणा केली. अखेर विमानतळाच्या उद्घाटनाचा दिवस उजाडला. बुधवारी (दि.8) आपल्या लोकनेत्यांचे नाव विमानतळाला देणार यामुळे आंदोलकर्त्याचा उत्साह शिगेला पोहचला होता. उद्घाटन कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रम संपत आला. त्यावेळी शेवटच्या भाषणांपैकी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या भाषणात दि. बा.पाटील यांच्या नावाचा उल्लेख संघर्षयोद्धा म्हणून झाला. हे सर्व ठीक वाटले. परंतु, दोन्ही नेत्यांनी विमानतळाच्या नामकरणाबाबत कोणतीच ठोस घोषणा केली नाही. यामुळे स्थानिकांचा भ्रमनिरास झाला. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करतील हे कानात साठवून ऐतिहासिक साक्षीदार बनण्यासाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांचे स्वप्न धुळीस मिळाले.
भ्रमनिरास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लोकनेते दि.बां.पाटील यांना अभिवादन करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाला दिबांचे नाव देण्याचा उल्लेख टाळल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजीचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळाले. तसेच राज्यातील नेत्यांनी देखील दिबांचे नाव देण्याबाबत कोणताही उल्लेख आपल्या भाषणात न केल्याने नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला एकप्रकारे पाने पुसत दगा दिल्याची भावना स्थांनिकांनी व्यक्त केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि.8) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळाला लोकनेते दि.बां.पाटील यांच्या नावाची घोषणा करतील हे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केवळ दिबांचे नाव घेत उपस्थित स्थानिकांचा भ्रमनिरासच केला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच अन्य नेत्यांनी दिबांचे नाव घेणे टाळले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाची चर्चा दोन दशकांपासून सुरू होती. अखेर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यामुळे अखेर आता इथून विमानाचे उड्डाण होईल, यावर शिक्कामोर्तब झाले. पीपीपी मॉडेलवर आधारित विमानतळ प्रकल्पाचा विकास करण्यात आला असून पहिला टप्प्यासाठी 19,650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आज विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर दोनपेक्षा अधिक विमानतळ असलेल्या लंडन, न्यूयॉर्क आणि टोक्योसारख्या जगविख्यात शहरांमध्ये आता मुंबईचाही समावेश झाला आहे. पहिल्या टप्प्यात नवी मुंबई विमानतळावर 1 टर्मिनल, 1 धावपट्टी व 10 बस गेट आणि 29 एरो ब्रिजेस बांधण्यात आले आहेत. मात्र विमान उड्डाणासाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पहिले विमान कधी उड्डाण घेणार?
अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे सीईओ अरुण बन्सल यांनी सांगितले की, विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर सुरक्षेचे उपाय तपासण्यासाठी विमानतळाचा ताबा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे देण्यात येईल. 30 ते 45 दिवस त्यांचे काम चालेल. तसेच आम्हाला सीमाशुल्क आणि इमिग्रेशन पथकाचे काम पाहण्यासाठी जवळपास 45 ते 60 दिवसांचा कालावधी लागेल.
विमानतळाचे कामकाज सुरळीत होण्याकरिता वरील कामे महत्त्वाची आहेत. त्याशिवाय पहिले उड्डाण घेण्यासाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सीईओ कॅप्टन बीव्हीजेके शर्मा आणि बन्सल यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पहिले व्यावसायिक उड्डाण घेण्याकरिता डिसेंबर 2025 उजडू शकते.
कोणकोणत्या एअरलाईन्स इच्छुक?
एअर इंडिया, आकासा एअर आणि इंडिगो या तीन कंपन्यांनी त्यांच्या काही सेवा नवी मुंबई विमानतळावर हलविण्यासाठीचा करार केला आहे. मागच्या महिन्यात एअर इंडियाने इथून 20 विमानांचे प्रस्थान (40 एअर ट्राफिक मुव्हमेंट) करण्याचे मान्य केले आहे. पहिल्या टप्प्यात भारतातील 15 शहरांत उड्डाण केले जाणार आहे. 2026 च्या मध्यापर्यंत एअर इंडिया दिवसाला 55 उड्डाण घेईल. ज्यात पाच आंतरराष्ट्री फ्लाईटचा समावेश असेल.
सुरुवातीच्या एका महिन्यासाठी उड्डाणे सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरु असतील. कोणती विमान कंपनी उड्डाणे घेईल, याविषयी स्पष्टता नसली तरी इंडिगो कंपनीचे विमान येथून पहिल्यांदा आकाशात झेपावेल असे बोलले जात आहे.
विमानतळाचे लोकार्पण झालं, याबद्दल आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिबांबद्दल गौरवोद्गार काढले. मुख्यमंत्री फडवणीस यांनीदेखील दिबांच्या नावाचा उल्लेख केलस. मात्र विमानतळाला दिबांचेच नाव देण्यात येईल, असा उल्लेख न केल्याने वाईट वाटलं. पण विमानतळाला दिबांचेच नाव लागेल, याबद्दल खात्री आहे.
अतुल पाटील
लोकनेते दि बां पाटील यांचे पुत्र
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता सुरू झाले आहे; पण आम्हा प्रकल्पग्रस्तांच्या मनातील आशा आणि अपेक्षा अद्याप जीवंत आहेत. या विमानतळाच्या नावात त्यागाचा आणि दि. बा. पाटील यांच्या कार्याचा सन्मान होईल का, हे येणारा काळच सांगेल.
रवि पाटील,
स्थानिक नेते, वहाळ
प्रकल्पग्रस्तांनी त्यांची गावे, राहती घरे, शेती, आयुष्य दिले. त्यामुळे विमानतळावर आमच्या त्यागाची ओळ राहावी, एवढीच इच्छा आहे. दि. बा. पाटील यांच्या नावाशिवाय या प्रकल्पाला पूर्णत्व नाही.
डॉ. प्रकाश टावरे, भिवंडी







