प्रवासी सुविधा केंद्र की एलअँडटीची कामगार वसाहत?

इमारती उभ्या; सुविधा गायब! गणेशोत्सवात प्रवाशांना सुविधा देण्याचा एलअँडटीचा दावा

| पोलादपूर | शैलेश पालकर |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेली महाड तालुक्यातील गांधारपाले आणि पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथील प्रवासी सुविधा केंद्रे सध्या नेमकी प्रवाशांसाठी की ठेकेदार कंपनीच्या कामगारांसाठी? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. प्रवासी सुविधा केंद्रांच्या इमारती उभ्या असल्या तरी प्रत्यक्षात त्यांचा वापर एलअँडटीच्या कामगारांची वसाहत तसेच गोदामासदृश्य पद्धतीने होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालक आणि प्रवाशांसाठी ही केंद्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. विशेषतः महाड औद्योगिक क्षेत्र पार केल्यानंतर पोलादपूर आणि कशेडी घाटाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना विश्रांती, प्रसाधनगृह, स्नानगृह, भोजन, वाहन दुरुस्ती आणि पार्किंगसारख्या मूलभूत सुविधांची मोठी गरज असते. याच उद्देशाने गांधारपाले आणि लोहारे येथे सुविधा केंद्रांच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत.

इमारतींचा दिखावा; सुविधा मात्र कागदावर?
प्रवासी सुविधा केंद्रांमध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छ व पुरेशा क्षमतेची प्रसाधनगृहे, स्नानगृहे, चहा-नाश्ता व कोकणी जेवणासाठी फूड कोर्ट, उपाहारगृह, वाहनांची किरकोळ दुरुस्ती, प्राथमिक मेकॅनिक, प्रशस्त पार्किंग आणि प्रवाशांना विश्रांती घेण्यासाठी हवेशीर दालन अशा सुविधा अपेक्षित आहेत. मात्र सद्यस्थितीत या सुविधांचा अभाव असून केवळ इमारती अस्तित्वात असल्याचे चित्र दिसत आहे. त्याच इमारतींचा वापर एलअँडटीच्या कामगारांकडून होत असल्याने प्रवाशांसाठी उभारलेल्या सुविधांचा उद्देशच हरवत असल्याचा आरोप होत आहे.
सुविधा कधी सुरू होणार?
गणेशोत्सव काळात मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होतात. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होते. अशा वेळी प्रवाशांना विश्रांती आणि प्रसाधनगृहांसह मूलभूत सुविधा मिळणे अत्यावश्यक आहे. मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरही सुविधा केंद्रांचा प्रत्यक्ष वापर सुरू नसताना गणेशोत्सव काळात सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा करण्यात आला आहे.
एलअँडटीचा दावा; प्रशासनाची भूमिका काय?
चांढवे टोलनाक्यावरील इमारतीत एलअँडटीचे कार्यालय असून कंपनीचे इंजिनिअर रवी देसाई यांनी आगामी गणेशोत्सव काळात गांधारपाले आणि लोहारे येथील दोन्ही प्रवासी सुविधा केंद्रे कार्यरत केली जातील, असा दावा केला आहे.तसेच चांढवे टोलनाक्यावरील प्रसाधनगृह-स्नानगृहाची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या सुविधा प्रत्यक्षात प्रवाशांसाठी सुरू करण्यास एवढा विलंब का केला? प्रवासी सुविधा केंद्रांच्या इमारतींचा वापर ठेकेदार कंपनीच्या कामगारांसाठी होत असताना संबंधित विभागांनी डोळेझाक का केली? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
फोटोसेशनपुरत्या सुविधा नकोत!
गणेशोत्सवात लाखो प्रवासी या मार्गावरून जाणार आहेत. त्यामुळे उद्घाटन, घोषणा किंवा आश्वासनांपेक्षा प्रत्यक्षात स्वच्छ प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी, भोजन, पार्किंग, विश्रांती आणि आपत्कालीन सुविधा सुरू असणे गरजेचे आहे. प्रवाशांसाठी बांधलेल्या इमारती कामगारांच्या ताब्यात आणि प्रवासी मात्र सुविधांच्या शोधातहा प्रकार कधी थांबणार? असा सवाल आता प्रवाशांकडून केला जात आहे. गणेशोत्सवापूर्वी सुविधा केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाहीत, तर त्याची जबाबदारी कोणाची? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Exit mobile version