| खेड | वृत्तसंस्था |
खेड तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या चोरवणे-गडकरवाडी व उतेकरवाडीला जोडणारा पुल तीन वर्षापूर्वी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीत एका बाजूला सरकला आहे. प्रशासनाने दुरूस्तीकडे अद्यापही लक्ष न दिल्याने सद्यस्थितीत पर्यायी लाकडी पुलावरून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे.
चोरवणेत उतेकरवाडी, बौद्धवाडी, गडकरवाडी, शिंदेवाडी, हनुमानवाडी, डांगेवाडी, सुतारवाडी, जखमींचीवाडी आदी ८ वाड्या आहेत. तालुक्यासह जिल्ह्याला दळणवळणासाठी जोडणारा एकमेव मार्ग आहे. नदीच्या पलिकडे असलेल्या उतेकरवाडी शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, रेशन दुकान, डाकघर, एसटी थांबा, शाळा व विद्यालय असल्याने सतत रहदारी सुरू असते. मात्र अतिवृष्टीदरम्यान मोठमोठी झाडे वाहून पुलावर अडकल्याने पूल एका बाजूला सरकून वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत लाकडी पुलावरून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत.