महिलांचा स्वच्छतेचा जागर

| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती क (कामोठे) विभागात स्वच्छता उत्सव 2023 साजरा करत स्वच्छतेच्या बाबत व्यापक जनजागृती करून रॅलीच्या माध्यमातून जनसंदेश देण्यात आला. महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग तसेच महिलांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेमध्ये झालेले बदल साजरे करणे यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानामध्ये आदिवासी विकास परिषद, दिशा महिला मंच, संस्कार महिला संस्था, सरस्वती महिला बचत गट, एमजीएम मेडिकल कालेज, रॉबिनहुड आर्मी, प्राथमिक आरोग्य केंद्र कमोठे, आशा स्वयंसेविका सहभागी झाले होते. यावेळी स्वच्छतेच्या बाबत व्यापक जनजागृती करून रॅलीच्या माध्यमातून संदेश देण्यात आला. या अभियानामध्ये महिला बचत गटाचे 20 स्टॉल लावण्यात आले होते.

या अभियानात अंदाजे 225 महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शेटे तसेच लेखा अधिकारी संग्राम व्होरकाटे यांच्या मार्फत सर्व स्वच्छता कर्णधारांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रभाग समिती क चे प्रभाग अधिकारी अरविंद पाटील, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, चिन्मय सापने, योगेश कस्तूरे, ऋषिकेश गायकवाड़, आतुल वास्कर, मिथुन पवार, तसेच सर्व पर्यवेक्षक आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version