। उरण । वार्ताहर।
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान- उमेद अंतर्गत, प्रेरणा व शिवसंग्राम महिला ग्रामसंघ केगाव आयोजित उरण नगरपरिषदेच्या सहकार्याने, महिला स्वयंसहायता समूह आणि महिला व्यावसायिकांच्या उत्पादनाची जाहिरात आणि विक्री व्हावी हा उद्देश ठेवून दोन दिवसीय प्रदर्शन आणि विक्री मेळावा महिलांच्या उत्कर्षासाठी मेहनत घेणार्या जयश्री पाटील, प्रज्ञा पारधी आणि जाईली तेरडे यांनी आयोजित केला होता. शनिवार, 30 आणि रविवार, 31 ऑक्टोबर रोजी उरण नगरपालिका शाळेचे नाना मराठी माध्यमिक शाळेचे मैदान येथे या भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध स्वयंसहायता गट आणि महिला व्यावसायिकांनी उत्साहाने भाग घेत दिवाळी फराळ, दिवाळी सजावट, कंदील, पणत्या, क्रॉकरी, साड्या, ड्रेसेस, मोत्यांच्या वस्तू, पेंटिंग्ज, चॉकलेट्स, व्हेज-नोव्हेज पदार्थ वगैरे एकूण 33 स्टॉल्स ठेवले होते. त्याचबरोबर महिलांचे आजार आणि त्यावरील उपलब्ध लसी आणि तपसण्या यांची माहिती देणारा डॉ. प्रीती गाडे यांचा स्टॉल आणि फिटनेसबद्दल माहिती देणार्या यूफोरियाच्या विदुला कुलकर्णी याच्या स्टॉलचा नागरिकांनी लाभ घेतला. तसेच स्वामी स्वरूपानंद दिव्यांग मुलांच्या शाळेला मुलांनी बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी आयोजकांतर्फे मोफत स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आला. तत्पूर्वी, नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या हस्ते आणि नायब तहसीलदार आशा म्हात्रे, केगाव सरपंच नंदकुमार पाटील, सीमा घरत यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले.