| पनवेल | प्रतिनिधी |
पोलिसांना आपण सर्वांनी सामाजिक वचक आणि संरक्षक म्हणून नेहमीच स्वीकारले आहे. लहानांपासून ते गुन्हेगारांपर्यंत पोलीस हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर येते ते कारागृह, बंदीवान, पोलीस गाडीचा सायरन आणि कोर्ट कचेरीचा ससेमिरा. मात्र, हेच पोलीस चोरट्यांच्या, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवतात तेव्हा ते देवदूत वाटतात. असेच देवदूत म्हणून सोमवारी रात्री कळंबोली पोलीस ठाण्याचे दादा माने धावून आले आणि चिमुकल्यांचे प्राण वाचले.
दरम्यान, दादा माने यांनी केवळ एक दोन नव्हे तर चक्क साडेसहा फुटांचा नाग अर्थात किंग कोब्रा मोठ्या शिताफीने पकडला. कामोठे पोलिसांकडून सोमवारी रात्रीपासून कोंबिंग ऑपरेशन सुरू होते. सेक्टर 34 मध्ये नवीन इमारतींचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी झोपडयांमध्ये पोलिसांनी तपासणी करण्यास सुरुवात केली. जवळच लहान मुले खेळताना दिसली. त्यांच्याजवळच या भल्यामोठया नागाने फणा उगारला. आता सर्व काही संपले म्हणून त्याठिकाणी लहान मुले, त्यांचे पालक धास्तावले. त्याचवेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विमल बिडवे यांना आपले सहकारी दादा माने हे सर्पमित्र असल्याचे सांगितले. माहिती मिळताच दादा माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि मोठ्या शिताफीने या महाकाय नागाचे तोंड आपल्या मुठीत पकडले. आणि खर्या अर्थाने प्रत्येक संकटातून समाजाचे रक्षण करणारा घटक म्हणजे पोलिस असे म्हणत प्रत्यक्षदर्शींनीही सुटकेचा निःश्वास सोडला.