रत्नागिरीत 400 वर्षांपूर्वीचा दुर्मिळ बाओबाब वृक्ष

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
उद्यमनगर येथील महिला रुग्णालयाच्या आवारात सुमारे 400 वर्षांपूर्वीचा बाओबाब हा आफ्रिकन जातीचा वृक्ष आढळून आला आहे. यामुळे पर्यावरण प्रेमी तथा निसर्ग अभ्यासकांचे कुतुहल जागे झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी महिला रुग्णालयाला भेट दिली होती. तेव्हा परिसराची पाहणी करताना त्यांना हा वृक्ष आढळून आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ एक विशेष बैठक घेऊन महिला रुग्णालयाच्या आवारात असलेल्या बाओबाब या वृक्षाला हेरिटेजचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी पर्यटन केंद्रही सुरू करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी सांगितले.
बाओबाब हा वृक्ष आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येतो. या वृक्षाचे खोड भलेमोठे असते. या खोडामध्ये हा वृक्ष पाणी साठवून ठेवतो. अतिशय दुर्मिळ असलेला हा वृक्ष अनेक वर्षे महिला रुग्णालयाच्या आवारात उभा आहे. पर्यावरणतज्ञ असलेल्या डॉ.बी.एन.पाटील यांच्या नजरेत हा वृक्ष आला.याबाबत जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील म्हणाले की, सुमारे 300 ते 400 वर्षांपुर्वीचा हा बाओबाब वृक्ष आहे. त्याचे जतन करणे जरुरीचे आहे. उशीरा का होईना पण आपण त्याचे जतन करत आहोत. त्या वृक्षाला हेरिटेजचा दर्जा देणार असून त्याठिकाणी पर्यटन केंद्रही सुरु करणार आहोत. त्या परिसरात त्या झाडाचे महत्व आणि माहिती पर्यटकांना दिली जाईल असेही जिल्हाधिकारी डॉ.पाटील यांनी सांगितले.

बाओबाब हा अतिशय दुर्मिळ प्रजातीमधील वृक्ष आहे. ज्या ठिकाणी पाणी आहे त्याच ठिकाणी तो वाढतो. हा वृक्ष त्याच्या खोडामध्ये पाणी साठवून ठेवतो. रत्नागिरीतील महिला रुग्णालयाच्या आवारात असलेल्या या बाओबाब वृक्षाच्या आजूबाजूला सुशोभीकरण करुन तो सेल्फी पॉइंट म्हणून विकसित करणार आहोत. – डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी

Exit mobile version