सुधागडात सापडला दुर्मिळ मांजऱ्या साप

सर्पमित्रांनी वनविभागाच्या मदतीने दिले जीवदान
| पाली/बेणसे | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील खुरावले येथील मुकुंद जाधव यांच्या घरामध्ये दुर्मिळ प्रजातीचा साडेचार फूट लांब फोर्स्टेन मांजऱ्या साप सर्पमित्र संदीप जाधव यांनी पकडला.

सर्पमित्र अमित निंबाळकर व वनविभागाच्या मदतीने या सापाला सुखरूप अधिवासात सोडण्यात आले. सर्पमित्र संदीप जाधव यांनी सांगितले की, हा निमविषारी गटात गणला जाणारा साप आहे. त्याचे डोके गोल कडा असलेले त्रिकोणी आकारचे असून मानेवर वाय किंवा गॅमा चिन्हासारखी खूण तसेच डोळ्याच्या बाहुल्या मांजराप्रमाणे उभ्या रचनेत असतात.

याशिवाय या सापाच्या अंगावर मांजराच्या त्वचेसारखा रंग आणि चट्टे असल्याने हा मांजऱ्या साप म्हणून ओळखला जातो. या मांजऱ्या सापामध्ये विशेष करून दोन रंग बघायला मिळतात एक लालसर तपकीरी रंग तर दुसरा करडा रंग आहे. मांजऱ्या साप सहज आढळणारा नसून हा झाडाच्या छिद्रात, घरट्यात, ढोलीत विशेषतः आढळतो.

सर्वसाधारणपणे या प्रजातीमध्ये साधा मांजऱ्या साप सर्वत्र आढळतो. पण मांजऱ्या साप काही विशिष्ट भागातच आढळतो. खुरावले येथे घरात पकडलेला साप पूर्ण वाढ झालेला सदृढ होता. शिवाय त्याने उंदीर खाल्ला होता. उंदराच्या शोधात तो घरात शिरला असावा , अशी माहिती सर्पमित्र अमित निंबाळकर दिली.

Exit mobile version