| उरण | प्रतिनिधी |
रयत शिक्षण संस्था म्हणजे संस्कारपीठ आहे, आज जो काही आहेे त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचा मोठा वाटा आहे, कॉलेजमध्ये शिकत असताना कमवा आणि शिका या योजनेमुळे मला शिक्षण घेणे शक्य झाले, असे उद्गार या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून सकाळ वृत्त समूहाचे माजी मुख्य संपादक, 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत उत्तम कांबळे काढले. येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कॉलेजमध्ये वीर वाजेकर यांची पुण्यतिथी व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, वीर वाजेकर कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत असतानाच उत्तम कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आपल्या आयुष्यातील खडतर प्रसंग व त्यावर जिद्दीने मात करीत मिळवलेले यश सविस्तर निवेदन केले. कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष माजी आमदार व रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचे चेअरमन बाळाराम पाटील यांनी दूरध्वनीवरून आपल्या शुभेच्छा कळवल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद पवार यांनी केले. महाविद्यालयाच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा कार्याध्यक्ष प्रा. श्रीकांत गोतपागर यांनी घेतला, तुकाराम हरी वाजेकर विद्यालयाचे प्राचार्य एम.जी. म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पारितोषिक वितरणाचे वाचन उपप्राचार्य डॉ. विलास महाले, डॉ. राहुल पाटील, डॉ. श्रेया पाटील यांनी केले.
याप्रसंगी सर्व गुणवंत प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी असणार्या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. यावेळी स्कूल कमिटी चेअरमन कृष्णाजी कडू, मीनाक्षी म्हात्रे, प्रभाकर कडू, रवीशेठ वाजेकर, परेश पाटील, रमाकांत म्हात्रे, सुरेश म्हात्रे, यशवंत ठाकूर, नितीन ठाकूर, कविता म्हात्रे, हरेश्वर ठाकूर, राजेश ठाकूर, बारा गाव महालण विभागातील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मा. पोलीस उपनिरीक्षक न्हावाशेवा, व इतर मान्यवर उपस्थित होते. मधुकर तुमडे, बाळकृष्ण दगडे, विद्यार्थी परिषद चेअरमन रेश्मा खान, सचिव, विद्यार्थी संसद परिषद आरती सुरवसे यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार डॉ. आमोद ठक्कर यांनी मानले. डॉ. श्रेया पाटील व डॉ.सुजाता पाटील यांनी उत्तम सूत्रसंचालन केले, शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.