। अलिबाग । प्रतिनिधी ।
वर्षाला जवळपास 5 कोटी रुपयांचे उत्पन्न असलेल्या, आमदारांचे स्वतःचे वास्तव्य असलेल्या थळ ग्रामपंचायत हद्दीत उखडलेले रस्ते, महावितरणचे जीर्ण पोल, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची होणारी वणवण पाहून गाव मोठा पण विकास छोटा असल्याचा प्रत्यय येतो.
निवडणूकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देऊन ग्रामस्थांची फसवणूक करणार्या बंडखोर आमदाराने थळ प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेकदा सांगूनही सत्ताधारी ढुंकूनही बघत नसल्यामुळे संतप्त महिलांनी आक्रमक पवित्रा घेत येत्या निवडणूकीत आमदारांना जागा दाखवून देऊ सांगत टीका केली.
थळ प्रभाग क्रमांक 4 मध्ये जवळपास 1700 मतदार आहेत. निवडणुकांमध्ये या ग्रामस्थांचे मतदान निर्णायक ठरले आहे. आपल्या गावातील आमदार झाल्याने गावकर्यांना, आता गावाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, असे वाटले होते. तसेच तालुक्यातील लोकं आपल्या गावाकडे आदर्श गाव म्हणून पाहतील, असेही अनेकांना वाटले होते. मात्र निवडून आल्यानंतर कोणताही मुलभूत बदल झाला नसल्याची खंत गावकर्यांनी बोलून दाखवली आहे.
पाण्याच्या भीषण प्रश्नासह गावातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. अनेकदा तक्रारी करुनही ग्रामपंचायत प्रशासन तसेच खुद्द आमदारही कानाडोळा करीत आहेत. वर्षाला चांगला उत्पन्न कमाविणार्या ग्रामपंचायतीला मिळणारा निधी गावाच्या विकासासाठी वापरता येऊ शकतो. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने आजमितिस ग्रामस्थांना सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत.
थळ गावासाठी फक्त एकच पाण्याची टाकी
सरकारी योजनेतून अनेक वर्षापूर्वी थळ गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू नये, याकरीता गावात पाण्याची टाकी उभारण्यात आली. मात्र वाढत्या लोकसंख्येनूसार ती टाकी अपुरी पडत आहे. परिणामी, प्रभाग 4 मधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नागरिकांच्या संख्येनूसार गावात अजून एक टाकी बांधणे आवश्यक आहे. मात्र याबाबतही आमदारांनी पोकळ आश्वासने देत फसवणूक केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्वतःच्या गावात सुविधांचा अभाव
आ. महेंद्र दळवी यांनी निवडणूकीपूर्वी केवळ आश्वासने दिली. मात्र प्रत्यक्षात विकासकामांकडे दुर्लक्ष केले. थळसारखी इतर अनेक गावे सध्या विकासाची आस घेऊन बसलेली आहेत, मात्र आमदार स्वतः राहत असलेल्या गावाचा विकास होत नसेल, तर तक्रार करायची कोणाकडे हा प्रश्न गावकर्यांपुढे आहे.
पाण्यासह थळ प्रभाग क्रमांक 4 मध्ये रस्त्यांचा प्रश्नही गंभीर आहे. याशिवाय विद्युत पोलावरील तारा घराला लागून असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. यापुर्वी विजेच्या झटक्याने ज्योती वाडकर या महिलेला नाहक जीव गमवावा लागला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, याकरीता प्रशासनाने विद्युत पोलाबाबतही उपाययोजना कराव्यात.
रुबीन साखरकर,
ग्रामस्थ, थळ