। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य नसल्याने जिल्हा नियोजन विकास समितीच अस्तित्वात नाही. त्यामुळे अस्तित्वच नाही मग बैठक कशाला हवी असा पुनरुच्चार खा. सुनील तटकरे यांनी केला. त्यामुळे जिल्ह्याचा विकास रखडणार यावर लक्ष वेधले असता त्यांनी त्यावेळी त्या आमदारांनी हा विचार केला नाही तो मी का करुन असा पवित्रा घेत आपल्या भुमीकेवर आपण ठाम असल्याचे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील, विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अमित नाईक यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी जिल्हा नियोजन समीतीच्या बैठकीवर आक्षेप घेतला गेला नसता तर जिल्ह्यात विकास कामे झाली असती. सत्ता बदलली म्हणजे कायदा बदलत नाही. सामुहिक विकासाची जबाबदारी सर्वांची आहे. त्यांची त्यावेळची भुमिका होती तीच भुमीका माझाही आता आहे. त्यांचेच संदर्भ देत मी याबाबतचे पत्र दिले असल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले. तरी जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित बसून मार्ग काढला पाहिजे अशी माझी स्वतःची भुमिका आहे. याला प्रतिसाद त्यांनी देणे अपेक्षित असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत शिंदे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असल्याकडे लक्ष वेधले असता सुनील तटकरे यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत मी पक्ष म्हणून पहात नाही. स्थानिक पातळीवर काही निर्णय घेतले असतील तर मला काही माहित नाही असे सांगत कानावर हात घेतले. ग्रामपंचायतीच्या निवडणूका पक्षीय चिन्हावर लढल्या जात नाहीत. ग्रामविकास समिती किंवा गाव पातळीवर लढवल्या जातात. त्यामुळे मला त्यातले माहित नाही. ज्यावेळी पक्षीय चिन्हावर निवडणूका येतील तेंव्हा आमची भुमिका स्पष्ट राहील असे त्यांनी सांगितले.