Palhe Bridge: पाल्हे पुलावर सावित्री पुलाची पुनरावृत्ती होणार?

आज कठडा, उद्या पूल कोसळणार!; बांधकाम विभाग अपघाताची वाट पाहतेय का?

| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील सहाण-पाल्हे-नागाव मार्गावरील पुलाचा संरक्षक कठडा रविवारी (दि.28) कोसळला असून, पूलसुद्धा केव्हाही कोसळेल, अशी भयानक अवस्था झाली आहे. कठडा कोसळल्याने रात्रीच्या अंधारात मोठा अपघात होण्याची भीती आहे. वर्षभरापासून या पुलाची डागडुजी सुरू आहे असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत असले तरी त्यांचा खोटारडेपणा जनतेच्या समोर आज उघडा पडला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाची पर्वा नसणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर अपघात झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 2016 साली भर पावसाळ्यात महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची वाट पाहताय का, असादेखील सवाल विचारला जात आहे.


अलिबाग तालुक्यातील सहाण-पाल्हे-नागाव मार्गावरील पाल्हे पुलाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच धोकादायक बनत चालली आहे. पुलाच्या बाजूची दगडी संरक्षक भिंत ढासळली असून, अनेक ठिकाणी लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. त्यातच आता पुलाच्या एका बाजूचा संरक्षक कठडा कोसळल्याने पुलाचा भाग उघडा पडला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसात वाहनचालकांना कठडा न दिसल्यास गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पुलाची अवस्था अधिकच बिकट झाल्याचे चित्र दिसत आहे. “काम सुरू आहे“ या एकाच उत्तरावर प्रशासन वेळ मारून नेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. पावसाळा सुरू झाला आहे, पुलाच्या दगडी भिंतीचे दगड निखळले आहेत. पुलावरून अवजड वाहनांची अवैध वाहतूक सुरूच असल्याने अतिरिक्त ताण येत आहे. अगोदरच वारंवार खडी व डांबराचे थर टाकल्यामुळे पुलाचे वजन वाढले असून, आधीच कमकुवत झालेल्या पुलाला स्वतःचाच भार पेलणे कठीण होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

16 टनांची मर्यादा फलकापुरतीच?
सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावर 16 टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना बंदी असल्याचे फलक लावले आहेत. मात्र, प्रत्यक्षात 30 ते 40 टन वजनाचे डंपर आणि इतर अवजड वाहने दिवस-रात्र या मार्गावरून धावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुलावरील ताण वाढत असून, संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.
माणसे मेल्यावरच जाग येणार का?
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियोजनशून्य कारभाराचा आणि दूरदृष्टीच्या अभावाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. पाल्हे बायपासवरील हा पूल नागाव, रेवदंडा, मुरुड आणि श्रीवर्धन परिसराच्या आर्थिक विकासाचा महत्त्वाचा दुवा आहे. हजारो पर्यटक आणि नागरिक याच पुलावरून दररोज प्रवास करतात. अशा परिस्थितीत पूल कोसळल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग पर्यायी मार्ग कुठून देणार? पुलाखाली जीवित आणि वित्तहानी झाल्यावरच या विभागाला जाग येणार का? सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधींचा वचकही या विभागावर राहिलेला दिसत नाही. त्यामुळेच ढिसाळ आणि बेजबाबदार कारभार सुरू आहे, असा घणाघाती आरोप ॲड. विनोद नाईक यांनी केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा
नागाव, रेवदंडा, मुरुड आणि श्रीवर्धन परिसराला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा असल्याने रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालावे. पुलाची तांत्रिक तपासणी करून अवजड वाहनांवर प्रभावी नियंत्रण आणावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. पुलाच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
लालपरीही धोक्यात!
बेली पूल कमकुवत असल्याचे कारण देत सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षभरापूर्वीच या पुलावरील एसटी बससेवा बंद करण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार सर्व बससेवा सध्या पाल्हे पुलावरून सुरू आहे. मात्र, पाल्हे पुलाचीही अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून या पुलावरील एसटी बससेवाही तातडीने बंद करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत अलिबाग आगाराचे आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांच्याशी संपर्क साधून पुलाच्या धोकादायक स्थितीची माहिती देण्यात आली. मात्र, ते चार दिवसांसाठी रजेवर असल्याने त्यांनी प्रभारी अधिकारी अभिजीत मांढरे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. श्री. मांढरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वर्षभर या पुलाचे काय काम केलेय, याचा जाब उद्याच मी त्यांच्या कार्यालयात जाऊन विचारणार आहे. दिवसेंदिवस या पुलाची अवस्था अधिक बिकट होत असतान, बांधकाम विभाग झोपा काढत आहे का? जनतेची सुरक्षा ही माझी प्रथम जबाबदारी आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही.

हर्षदा मयेकर,
सरपंच, नागाव ग्रामपंचायत


पुलाचा संरक्षक कठडा कोसळल्याची बातमी समजली आहे. ठेकेदाराला तात्काळ संरक्षक कठडा लावण्याचे आदेश दिले आहेत.

मोनिका धायतडक,
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
Exit mobile version