कोनमध्ये विधवा प्रथा बंदीचा ठराव

| नवीन पनवेल | वार्ताहर |
तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोन गावामध्ये विशेष ग्रामसभेमध्ये विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. सरपंच दीपक धाया म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक रमेश नामदेव तारेकर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या ग्रामसभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

भारतात शेकडो वर्षांपासून चालत आलेली विधवा प्रथा का मोडीत काढली पाहिजे, त्याची कारणमीमांसाही उपस्थितांना समजावून सांगितली. मृतानंतर त्याच्या पश्‍चात पत्नीवर मुलगी, मुलांसह उर्वरित परिवाराची जबाबदारी येते. अशा परिस्थितीत तिने काबाडकष्ट करून त्या मुलांना लहानाचे मोठे करणे व शिक्षण देणे, अशा जबाबदार्‍या महिला पेलतात. त्या स्त्रीला समाजातील काही विशिष्ट लोकांकडून विधवा स्त्री असे टोमणेदेखील ऐकायला मिळत असतात आणि समाजाचा बघण्याचा दृष्टिकोनही बदललेला असतो.

त्यामुळे समाजातील मतप्रवाह बदलण्यासाठी अशा पद्धतीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या ठरावाचे सूचक अशोक नामदेव घरत (कोन गाव) आणि अनुमोदक ज्ञानेश्‍वर धोंडू बडे यांनी केले. ग्रामपंचायतचे माजी सरपंच बाळकृष्ण पाटील, माजी उपसरपंच जितेश शिसवे, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

महिलांच्या सन्मानासाठी
व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या पत्नीचे मंगळसूत्र तोडून त्यातील मणी काढून त्या व्यक्तीच्या तोंडात ठेवण्याची प्रथा आहे. ही बंद करायची असेल, तर मंगळसूत्र न तोडता फक्त तुळशीपत्र तोंडात ठेवणे हे चालू करण्यात येणार आहे. तसेच हातातील बांगड्या फोडणार नाही आणि कपाळावरील कुंकू पुसायचे नाही, असा प्रयत्न आहे. महिलांना सन्मानाने जगण्यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत.असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे

Exit mobile version