राजीनाम्यासाठी डाव्या पक्षांचा एल्गार
| मुंबई | प्रतिनिधी |
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर, मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या प्रक्रियेवर आणि मतदारांच्या हक्कांशी संबंधित मुद्द्यांवरून डाव्या विचारांच्या पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून, बुधवारी (दि.1) दुपारी 3 वाजता मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली आहे.
या आंदोलनात शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मा.ले. तसेच अन्य डाव्या विचारांचे पक्ष सहभागी होणार असल्याचे शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा ॲड. साम्या कोरडे यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि मतदारांच्या अधिकारांचा मुद्दा पुढे नेण्याची भूमिका पुरोगामी विचारांच्या पक्षांकडून मांडली जात आहे.
ज्ञानेश कुमार, बस्स झालं!
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच त्यांनी केलेला प्रताप लोकशाहीविरोधी असून, त्यांना अटक करावी, ही या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदारांची नावे वगळली जात असल्याचा दावा ॲड. साम्या कोरडे यांनी केला असून, अशा प्रक्रियेमुळे मतदारांच्या मतदानाच्या अधिकारावर परिणाम होऊ शकतो, असा आक्षेपही त्यांनी नोंदविला आहे. एसआयआर प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या प्रश्नांना जबाबदार कोण, मतदारयादीतील बदलांची जबाबदारी कोणाची आणि निवडणूक प्रक्रियेत उत्तरदायित्व निश्चित कसे होणार, असे सवाल आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
डाव्यांची एकजूट; आंदोलनाची दिशा स्पष्ट
शेतकरी कामगार पक्षासह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मा.ले. आणि अन्य डाव्या पक्षांच्या सहभागामुळे मुंबईतील आंदोलनाला व्यापक स्वरूप मिळणार आहे. निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, प्रक्रिया आणि मतदारांच्या अधिकारांचा प्रश्न या मुद्द्यांवरून केंद्रित आंदोलन उभे करण्याची तयारी या पक्षांकडून केली जात आहे. ‘ज्ञानेश कुमार, बस्स झालं!’ या घोषणेसह राजीनाम्याची मागणी लावून धरत आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्धार डाव्या पक्षांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
लोकशाही वाचवा, मतदानाचा अधिकार जपा
मतदारयादीतील नाव हा केवळ प्रशासकीय नोंदीचा विषय नसून तो नागरिकांच्या मतदानाच्या घटनात्मक अधिकाराशी संबंधित असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांकडून मांडली जात आहे. त्यामुळे कोणत्याही पात्र मतदाराचे नाव प्रक्रियात्मक त्रुटींमुळे वगळले जाऊ नये, यासाठी स्पष्ट आणि पारदर्शक यंत्रणा आवश्यक असल्याचा आग्रह डाव्या पक्षांकडून धरला जात आहे.
आझाद मैदानात घोषणांचा गजर
1 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनात शेकापचे राज्य कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा ॲड. साम्या कोरडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. मिलिंद रानडे, भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. शैलेंद्र कांबळे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मा.ले.चे डॉ. विजय कुलकर्णी तसेच डाव्या पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यावेळी राजीनाम्याच्या मागणीसह एसआयआर प्रक्रियेवरून सरकार आणि निवडणूक आयोगाला जाब विचारण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
