भाजपच्या किरण शेलार यांचा पराभव
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत होती. यावेळी अनिल परब यांचा 26 हजार 26 मतांनी विजय झाला आहे. मतदारांनी यावेळी भाजपला नाकारले असून उध्दव ठाकरेंवर पुन्हा विश्वास व्यक्त केल्याची प्रतिक्रिया वरून सरदेसाई यांनी म्हटले आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी मतदान पार पडले होते.
अनिल परबांच्या विजयामुळे शिवसेना ठाकरे गटाला मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम राखण्यात यश मिळाले आहे. विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना अनिल परब म्हणाले की, हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करतो. बाळासाहेबांचा आशीर्वाद असाच कायम राहू दे. उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी आभारी आहे. माझ्या विजयासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीचे घटकपक्ष लढले त्यांचा आभारी आहे.