| मुंबई | प्रतिनिधी |
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या 10.20 कोटी रुपयांची मालमत्तेवर तात्पुरती जप्ती आणली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील 42 गुंठे जमीन व त्यावर बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा समावेश असून, त्याची किमत 7 कोटी 46 लाख 47 हजार असल्याचे समजते.
पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अनिल दत्तात्रय परब, मेसर्स साई रिसॉर्ट, मेसर्स सी शंख रिसॉर्ट आणि इतरांविरुद्ध दापोलीतील न्यायदंडाधिकार्यांकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तपास सुरू केला आहे. पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 च्या कलमांचे उल्लंघन झाल्याने अनिल परब आणि इतरांविरुद्ध राज्य सरकारची फसवणूक आणि नुकसान केल्याबद्दल दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ईडीने सविस्तर परिपत्रकही जाहीर केले आहे.