भाजपा, शिंदे गटाला चारली धूळ
| रायगड | प्रतिनिधी |
जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत इंडिया आघाडीने बाजी मारली आहे. शेकाप, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) या प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत भाजपा आणि शिंदे गटातील शिवसेनेच्या उमेदवारांना धूळ चारली आहे. सर्व विजयी उमेदवारांचे शेकापचे आमदार जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार अनंत गीते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह अन्य नेत्यांनी अभिनंदन केले. निवडणुकीत मिळालेल्या यशाने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत विजयी गुलाल उधळला.
जिल्ह्यातील 179 ग्रामपंचायतीमधील 168 सरपंच आणि 246 सदस्यपदाच्या निवडणुकीचे निकाल संबंधित तहसिदार कार्यालयात सोमवारी झालेल्या मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आले. अलिबाग, मुरुड, रोहा, उरण, पनवेलसह अन्य तालुक्यात इंडिया आघाडीचे वर्चस्व सिध्द झाले आहे. अलिबाग तालुक्यातील खानाव, नागांव, खंडाळे, माणकुळे, कामार्ले, वाघ्रण शहाबाज, चिंचवली, तसेच उरण ग्रामपंचायतीमधील जासई, दिघोडे, चिरनेर, मुरुड तालुक्यातील शीघ्रे, विहूर, नांदगाव, मांडला, राजपुरी आणि पनवेल तालुक्यातील दापोली, गिरवले, कसळखंड, धुंदरे, कोन, गुळसुंदे, वावेघर यासह अन्य तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक भाजपा आणि शिंदे गटाने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. यासर्व ठिकाणी इंडिया आघाडीने विजयी मोहर उमटवली आहे.
अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायतीमधील काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी ऐन निवडणूकीच्या तोंडावर शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे शिंदे गट बाजी मारणार असे चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र इंडिया आघाडीने पूर्ण बाजी पलटवत शिंदे गटाला चारीमुंड्या चित केले आहे. त्यामुळे गोंधळी यांचा शिंदे गटातील पक्ष प्रवेश हा राजकीय आत्महत्या ठरल्याची खानाव परिसरामध्ये जोरदार चर्चा आहे. स्थानिक आमदाराला अलिबाग, मुरुडमध्ये फारसे यश संपादन करता आले नसल्याचे चित्र आहे. सुरुवातीपासूनच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जागावाटपामध्ये सामंजस्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे उमेदवार निवडीमध्ये कोठे फारशी धुसफूस दिसून आली नाही. वेळप्रसंगी शेकापने आपल्या जागा या इंडिया आघाडीतील घटक पक्षांना सोडल्या होत्या. एकदिलाने निवडणुकीला सामोरे गेल्याने इंडिया आघाडीला विजय संपादित करता आला आहे.
एकजुटीने काम करून ऐतिहासिक विजयः आ. जयंत पाटील इंडिया आघाडी म्हणून आम्ही एकत्र आलो. शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व असले तरी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) आम्ही एकजुटीने निवडणुकीत काम करून ऐतिहासिक विजय मिळविला आहे. याचाच प्रत्यय म्हणून इंडिया आघाडीमुळे विविध ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन घडले आहे. अलिबाग-खानावसारख्या ग्रामपंचायतीमध्ये असणारी दादागिरी इंडिया आघाडीच्या प्रयत्नामुळे संपुष्टात आली आहे. खानाव ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांना औद्योगिकरणात रोजगार मिळेल. आतापर्यंत कंत्राटी कामगारांच्या मेहनतीचा मोबदला लाटणाऱ्यांना जनतेने हद्दपार केले आहे. भविष्यात या ग्रामपंचायतीमध्ये स्थानिकांचा विकास करण्यावर भर दिला जाईल. इंडिया आघाडीचा सरपंच मताधिक्क्याने निवडून आला आहे. आता उपसरपंचपदाच्या नावाची प्रतीक्षा जनतेला असेल. यामुळे उपसरपंचपदासाठी निलेश गायकर यांचे नाव आजच जाहीर करतो.