कलेच्या गावाला मानाचा मुजरा: पानिपतकार पाटील

| चिरनेर | प्रतिनिधी |

शिवछत्रपतींच्या रायगड जिल्ह्यात इतिहास घडत असताना, या जिल्ह्यातील गोवठणे गावात ऐतिहासिक नाटकाची परंपरा उभी केली जात असताना, या गावाच्या रंगभूमीने शेकडो वर्षाच्या नाट्यकलेची समृद्ध परंपरा जोपासत, ग्रामीण रंगभूमीच्या नाट्य परंपरेचा प्रेरणादायी वारसा जोपासत, या रंगभूमीने अनेक दर्जेदार आणि रसिकमान्य नाटके दिली. त्यामध्ये माझ्या लेखणीतून उतरलेली रणांगण हि नाट्य कलाकृती या छोट्याशा गावामध्ये मोठ्या उत्साहाने उमलत आहे. त्यामुळे या बहाद्दर कलाप्रेमी गावाला मी मानाचा मुजरा करतो. असे भावनिक उद्गार पानिपतकार विश्वास पाटील यांनी काढले.

गोवठणे येथील रंगभूमीत जय हनुमान नाट्य मंडळाच्या वतीने शनिवारी (दि. 23) रात्री दहा वाजता रणांगण या दोन अंकी नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पानिपतकार विश्वास पाटील हे आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलत होते. या प्रसंगी रायगड भूषण एल. बी. पाटील, कांतीलाल कडू, साहित्यिक डॉ. राठोड, साहित्यिक सुधाकर पाटील, नाट्य दिग्दर्शक पांडुरंग पाटील, पत्रकार अजित पाटील, राणी म्हात्रे, सुरज म्हात्रे, रुपेश पाटील, चंद्रशेखर ठाकूर, समाधान म्हात्रे, हसूराम पाटील, धनेश्वर म्हात्रे, अशोक म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यापुढे विश्वास पाटील यांनी दिग्दर्शक नटवर्य पांडुरंग पाटील यांनी आपले कसब वापरत, अभिनयाच्या जोरावर रणांगण सारख्या नाटकाचे शिवधनुष्य लिलया पेलले आहे. त्यांच्यासह येथील सर्व कलाकारांनी ग्रामीण रंगभूमीसाठी दिलेले योगदान मोठे आहे. अनेक ग्रामीण कलाकारांनी अभिनयाच्या जोरावर ग्रामीण रंगभूमी समृद्ध केली आहे. असे सांगून पानिपतचा प्रसंग मोठा होता. दिल्लीच्या रक्षणासाठी शिंदे, होळकर व पेशवे हे पानिपतावर लढले. एक लाख बांगडी या पानिपतच्या मैदानावर चुरडली गेली. अशा या प्रचंड लढाईची कहाणी या नाटकातून साकारली गेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version